Actor Dharmendra News: बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबर 2025 रोजी या जगाचा निरोप घेतला. वयाच्या 89व्या वर्षी त्यांचे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरलीय. तब्बल 65 वर्षे त्यांनी सिनेसृष्टीसह चाहत्यांच्या मनावर राज्य केले. सेलिब्रिटींपासून ते चाहत्यांनीही धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली. अभिनेता निकितिन धीरनेही इन्स्टाग्रामवर अतिशय भावुक पोस्ट शेअर केलीय. पोस्टमध्ये त्याने लिहिलंय की त्याचे वडील आणि अभिनेते पंकज धीर यांचे 15 ऑक्टोबर 2025 रोजी निधन झालं. त्यावेळेस धर्मेंद्र यांच्यावर हॉस्पिटलच्या आयसीयू विभागामध्ये औषधोपचार सुरू होते, अशा अवस्थेतही त्यांनी निकितिनच्या आईला फोन केला.
धर्मेंद्र यांचं फोनवर काय संभाषण झालं होतं?
धर्मेंद्र (Dharmendra News) यांनी फोन करून पंकज धीर यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं. धर्मेंद्र म्हणाले की, "चिंता करू नका, मी लवकरच ठीक होऊन घरी परतेन". त्यांचे हे बोल ऐकून कुटुंबीय इतके आश्चर्यचकित झाले की इतकी गंभीर अवस्था असतानाही ते इतरांचं दुःख स्वतःचे समजत होते. निकितिन धीरने याबाबतची माहिती सोशल मीडियावर शेअर करून धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिलीय.
(नक्की वाचा: Dharmendra: धर्मेंद्र यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार का नाही? शेवटचं दर्शन का दिलं नाही? दुःखी चाहत्यांचे असंख्य प्रश्न)
धर्मेंद्र यांचा स्वभाव कसा होता?
निकितिन धीरने लिहिलंय की, "मी आणि माझे बाबा अनेकदा चित्रपटसृष्टीतील आजपर्यंतचा सर्वात यशस्वी नायक कोण आहे याबाबत चर्चा करायचो. क्षणाचाही विलंब न करता ते म्हणायचे, धरम अंकल.. ते नेहमी म्हणायचे, सर्वात देखणा, सर्वात नम्र आणि उदार माणूस.. पूर्णपणे सच्चा.. धरम अंकल.. जेव्हा माझ्या वडिलांचे निधन झाले, तेव्हा धरम अंकलने माझ्या आईला आयसीयूमधून फोन केला. सांत्वन करत आईला सांगितलं की, ते लवकरच घरी परत येतील, काळजी करू नका..'
निकितिन धीर याने पोस्टमध्ये असंही लिहिलंय की,'धर्मेंद्र यांचे जाणे हे एक वैयक्तिक नुकसान आहे. आम्ही त्यांच्या कुशीमध्ये वाढलोय. त्यांच्याकडून केवळ प्रेम आणि आशीर्वाद मिळालाय. त्यांना कायम हसताना पाहिलंय, त्यांच्या हास्याने प्रकाश पसरायचा. सिनेसृष्टीतील तुमच्या योगदानाबाबत धन्यवाद. बालपणी आम्हाला आनंद दिल्याबाबत आभार. एक माणूस काय असू शकतो आणि कसा असला पाहिजे, याचे उदाहरण आम्हाला दाखवण्यासाठी आभार. तुमची जागा कोणी घेऊ शकत नाही. दुसरे धर्मेंद्र कधीही होणे नाही. माझ्या कुटुंबाकडून सहवेदना'.
गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र यांची प्रकृती ठीक नव्हती. 31 ऑक्टोबर रोजी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 12 नोव्हेंबर रोजी त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला, यानंतर निवासस्थानीच औषधोपचार सुरू होते. पण 24 नोव्हेंबर रोजी त्यांचे निधन झाले.