Actress Bhagyashree Nhalve: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवे हिने मासिक पाळीच्या दिवसांमधील आहारापासून ते विश्रांतीपर्यंतच्या विषयावर अत्यंत मोकळेपणाने भाष्य केले आहे. 'कुंकू टिकली आणि टॅटू' तसेच 'रमा राघव' यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या या अभिनेत्रीने मासिक पाळीत मिळणाऱ्या विश्रांतीकडे पाहण्याचा एक नवा आणि सकारात्मक दृष्टिकोन मांडला आहे. समाजात मासिक पाळीबाबत अनेक समज-गैरसमज असताना तिने आजीने दिलेल्या शिकवणीचा संदर्भ देत महिलांच्या आरोग्याचा मुद्दा अधोरेखित केला.
आजीची शिकवण अन् विश्रांतीचा नवा दृष्टिकोन
भाग्यश्री म्हणाली की, लहानपणापासून ते आजही मी मासिक पाळीच्या काळात बाजूला बसते. माझी आजी नेहमी सांगायची की, या 5 दिवसांत बाजूला बसणे हा स्त्रियांसाठी शाप नसून त्यांना मिळालेला एक प्रकारे आराम आहे.
आपण प्रत्येक गोष्टीकडे कोणत्या दृष्टिकोनाने पाहतो ते महत्त्वाचे असते. मला याचा अजिबात संकोच किंवा लाज वाटत नाही. उलट या दिवसांकडे शरीराला दिलेल्या एका छोट्या ब्रेकच्या रूपात पाहिले पाहिजे. 4 दिवस स्वतःला वेळ देणे, आवडीची पुस्तके वाचणे, पेंटिंग करणे किंवा नामस्मरण करत निवांत राहणे यात काहीच वावगे नाही.
( नक्की वाचा : राजेश खन्नांनी ओढावून घेतला मृत्यू! शेवटच्या दिवसांत कशी होती अवस्था? कथित गर्लफ्रेंडने सांगितलं सारं सत्य )
सासरच्यांचा पाठिंबा अन् निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली
लग्नानंतर सासरीही या पद्धतीचा स्वीकार केल्याचे सांगताना भाग्यश्रीने सांगितले केले की, सासरच्या मंडळींचा माझ्या बाजूला बसण्यावर काहीच आक्षेप नसतो. उलट या काळात मी निवांत विश्रांती घेते, वेळेवर खाते-पिते आणि पुरेशी झोप घेते. यामुळेच मी अधिक निरोगी राहू शकते. देवाला जाणे किंवा न जाणे हा वैयक्तिक श्रद्धेचा भाग वेगळा असू शकतो, पण शरीराला आवश्यक असलेला 4 दिवसांचा ब्रेक हा प्रत्येकाने देऊन पाहिला पाहिजे.
आजच्या तरुण मुलींमध्ये वाढणाऱ्या PCOD, PCOS आणि इनफर्टिलिटी यांसारख्या आरोग्यविषयक समस्यांवर बोलताना तिने महत्त्वाचा सल्ला दिला. सातत्याने पुरुषांशी बरोबरी करण्याच्या नादात महिला स्वतःच्या आरोग्याकडे आणि शारीरिक विश्रांतीकडे दुर्लक्ष करतात.
स्त्रिया आधीच सक्षम आहेत, त्यामुळे सततच्या धावपळीतून ब्रेक घेऊन स्वतःसाठी वेळ काढणे, फिरायला जाणे आणि निसर्गाने दिलेल्या शरीराच्या चक्राचा आदर करणे हे महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे असल्याचे तिने स्पष्ट केले.
( नक्की वाचा : फार्महाऊसमध्ये 17 महिने गाडले गेले होते 6 जीव; राजेश खन्ना यांच्या अभिनेत्रीच्या हत्येची चटका लावणारी कहाणी )
आईच्या निधनानंतर सासरच्यांनी दिला धीर
लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच भाग्यश्रीने तिच्या आईला गमावले होते. हा तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि दुःखाचा आघात होता. मात्र, या खडतर काळात तिच्या सासरच्या मंडळींनी तिला खंबीर पाठिंबा देत या दुःखातून बाहेर पडण्यास मदत केली. कठीण प्रसंगात साथ देणाऱ्या कुटुंबाबद्दल आणि सासरच्यांविषयी ती नेहमीच कृतज्ञता व्यक्त करत असते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world