जाहिरात

मच्छी मार्केटमध्ये घर, टेलरींगमधून आईने मोठं केलं; 'मुसाफिर कॅफे'मुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्रीचं मराठी कनेक्शन

प्रत्येकाच्या यशामागे एक संघर्ष असतो. सध्या चर्चेत असलेल्या 'मुसाफिर कॅफे' या वेब सीरिजमधील महिमा मकवानाचं आयुष्यही सहज सोपं नव्हतं.

मच्छी मार्केटमध्ये घर, टेलरींगमधून आईने मोठं केलं; 'मुसाफिर कॅफे'मुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्रीचं मराठी कनेक्शन

प्रत्येकाच्या यशामागे एक संघर्ष असतो. सध्या चर्चेत असलेल्या 'मुसाफिर कॅफे' या वेब सीरिजमधील महिमा मकवानाचं आयुष्यही सहज सोपं नव्हतं. आईच्या इच्छेसाठी महिमा अभिनय क्षेत्रात आली. टीव्ही मालिकांच्या माध्यमातून स्वत:ची ओळख निर्माण केली. मुसाफिर कॅफेच्या निमित्ताने आता ती घराघरात पोहोचली आहे. 

मराठी चित्रपटातून सुरुवात करावी ही आईची इच्छा...

महिमाचा जन्म ५ ऑगस्ट १९९९ रोजी  दहिसरमधील एका चाळीत झाला. ती राहत असलेल्या भागाचं नाव मच्छी मार्केट होतं. महिमाची आई मराठी आहे. त्यामुळे आपल्या लेकीने अभिनयाची सुरुवात एक मराठी चित्रपटातून करावी अशी त्यांची इच्छा होती. मात्र काही कारणास्तव तिला मराठीत संधी मिळाली नाही. विशेष म्हणजे महिमाच्या घरातही नियमित मराठीत बोललं जातं. अगदी स्वयंपाकघरातही मराठी पदार्थ केले जातात. महिमा चार महिन्यांची असताना तिच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर आईने तिचा सांभाळ केला. टेलरींग, टिकलीचं काम करून महिमा आणि तिच्या भावाला आईने मोठं केलं, असं महिमाने एका मुलाखतीत सांगितलं. मराठीशी खास नातं असल्याचं ती आवर्जुन सांगते. 

वयाच्या १४ व्या पहिलं घर केलं खरेदी...

महिमाने लहान वयात अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तिने अनेक मालिका आणि बाल अभिनेत्री म्हणूनही काम केलं. वयाच्या १४ व्या वर्षी महिमाने मीरा रोड येथे पहिलं घर खरेदी केलं. आता महिमाकडे आणखी एक घर आहे. २०२५ मध्ये आईच्या वाढदिवशी मुंबईत तिने दुसरं घर खरेदी केलं होतं. 

महिमाने बालिका वधू, सपने सुहाने लडकपन,  मोहे रंग दे, रिश्तों का चक्रव्यूह, अधूरी कहानी हमारी आणि शुभारंभ  सारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं. २०२१ मध्ये सलमान खान आणि आयुष शर्मासह अंतिम द फायनल ट्रूथमध्येही ती झळकली. कमी वयात महिमाने मोठं यश संपादन केलं आहे. आता महिमा १० कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. मुसाफिर कॅफेसाठी तिने २ ते ३ कोटी फी घेतली होती. अभिनयाव्यतिरिक्त ती ब्रँड एँडोर्समेंट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिची कमाई होते. 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com