Marathi Actress Priya Marathe Shantanu Moghe Love Story: अस्सल मराठमोळं सौंदर्य, मराठीसह हिंदी सिनेविश्व गाजवणारी अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनाने मनोरंजन जगतावर शोककळा पसरली आहे. प्रिया मराठे कर्करोगाशी झुंज देत होती. यातच वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. प्रिया मराठे आणि अभिनेता शंतनू मोघे हे मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय कपल म्हणून ओळखले जात होते. प्रिया आणि शंतनू यांची लव्हस्टोरीही खूपच हटके आहे. जाणून घ्या त्याची खास स्टोरी.
लोकप्रिय अभिनेते शंतनू मोघे आणि प्रिया मराठे यांच्या लग्नाला 12 वर्ष झाली आहेत. दोघांचाही मनोरंजन विश्वात संघर्ष सुरु असतानाच एकमेकांची ओळख झाली. अभिनेत्री प्रिया मराठेही मूळची ठाण्याची. तिच्या एका मैत्रिणीमुळे तिची आणि अभिनेते शंतनू मोघे यांची ओळख झाली. शर्वरी लोहकरे या मैत्रिणीसोबत प्रिया अंधेरीला राहायची. याच शर्वरीचा मित्र म्हणजे अभिनेते शंतनू मोघे. तिनेच प्रिया आणि शंतनूची भेट घडवून दिली. आई या मालिकेच्या निमित्ताने दोघेही पार्टीमध्ये एकत्र भेटले. या भेटीनंतर प्रिया आणि शंतनू यांची मैत्री झाली.
दोघांमध्येही संवाद, भेटीगाठी वाढल्या याच भेटीतून त्यांच्यात प्रेम बहरलं. जवळपास दीड वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाआधी शंतनूने अगदी फिल्मी स्टाईलमध्ये प्रियाला प्रपोज केले. तुळजापूरला 'नव तारका' या कार्यक्रमावेळी शंतनू मोघेंनी प्रियाला लग्नाबद्दल विचारलं. त्यांच्या घरातूनही लग्नाला विरोध झाला नाही. त्यानंतर 24 एप्रिल 2012 रोजी प्रिया ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघेंची सून झाली. श्रीकांत मोघे यांचा मुलगा आणि अभिनेता शंतनू मोघेसोबत प्रियाचे अगदी थाटात लग्न झाले.
दरम्यान, प्रिया तिच्या सोशल मीडियावर पती शंतनू मोघेसोबतचे नवनवे फोटो आणि व्हिडिओ नेहमी शेअर करत होती. मराठी सिनेसृष्टीतील क्यूट कपल म्हणून प्रिया- शंतनूच्या केमिस्ट्रीचे कौतुक केले जात होते. मात्र या दोघांच्या सुंदर नात्याला नजर लागली अन् प्रियाने अशी अवेळी एक्झिट घेतली. तिच्या निधनाने सिनेविश्वासह अभिनेते शंतनू मोघे आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.