Rani Padmini Death News: भारतीय सिनेसृष्टीमध्ये अशा कित्येक अभिनेत्या होत्या, ज्यांच्या अचानक झालेल्या निधनाच्या वृत्तामुळे चाहत्यांसह संपूर्ण देश हादरला होता. काही जणींच्या आयुष्यात इतक्या भयावह गोष्टी घडल्या की त्यावर विश्वास ठेवणेही कठीण आहे. यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे राणी पद्मिनी. दाक्षिणात्य सिनेमांमधील अभिनेत्री राणी एखाद्या अप्सरेप्रमाणेच होती. पद्मिनी डबिंग आर्टिस्ट इंद्रा कुमारी यांची मुलगी होती, 1962 साली तिचा जन्म झाला होता. मुलगी मोठी अभिनेत्री व्हावी, अशी इंद्रा यांची इच्छा होती. यासाठी त्यांनी लेकीला लहानपणी नृत्याचे धडे देण्यास सुरुवात केली आणि पद्मिनी मोठी झाल्यानंतर इंद्रा तिला घेऊन मुंबईमध्ये स्थायिक झाल्या.
आईसोबत मिळून पद्मिनीने केला संघर्ष
इंद्रा आणि त्यांची मुलगी पद्मिनीने मुंबईमध्ये बराच संघर्ष केला, यश काही केल्या मिळत नव्हते. पण आई-मुलीने हार पत्करली नाही. अखेर 1981 साली पद्मिनीला मल्याळम 'वलंगुम वीणायम' सिनेमामध्ये छोट्या भूमिकेची संधी मिळाली. यानंतर पद्मिनीला 'संकरशम' सिनेमा मिळाली. या सिनेमांनंतर पद्मिनीचे नशीब पालटलं, सिनेसृष्टीचे द्वार तिच्यासाठी खुले झाले. दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल आणि ममूटी यांच्यासोबत तिने काम केले. कालांतराने पद्मिनीने तिचे नाव बदलून 'राणी पद्मिनी' असे ठेवले. पद्मिनीने कन्नड, मल्याळम आणि तमिळ अशा सुमारे 60 सिनेमांमध्ये जबरदस्त भूमिका पार पाडल्या.
(नक्की वाचा: Tharala Tar Mag Serial: दिवाळी मुहूर्तावर नव्या पूर्णा आजीची दिसली झलक, 'ठरलं तर मग' मालिकेच्या चाहत्यांसाठी खूशखबर)
अभिनेत्रीच्या आयुष्यात घडली भयानक घटना
पद्मिनीला जसजसे यश मिळत गेले तसतसे तिची आर्थिक परिस्थितीही सुधारत गेली. चेन्नईतील अण्णा नगर येथे तिने सहा खोल्यांचा आलिशान बंगला खरेदी केला आणि ती आईसोबत तेथे राहायला गेली. घरामध्ये काम करण्यासाठी तिने एका वर्तमानपत्राद्वारे स्वयंपाकी, सुरक्षारक्षक आणि ड्रायव्हर अशी माणसे कामाला हवी असल्याची जाहिरात दिली. त्यानुसार तिने काही लोकांना घरामध्ये कामासाठी ठेवलं. दरम्यान एकेदिवशी शुटिंगवरून घरी परतत असताना ड्रायव्हरसोबत तिचा वाद झाला आणि तिने तत्काळ त्याला कामावरुन काढले.
पद्मिनीचा बदला घेण्यासाठी ड्रायव्हर सुडाने पेटला होता. सुरक्षारक्षक आणि स्वयंपाकीसोबत मिळून ड्रायव्हरने पद्मिनीच्या घरी चोरी करण्याचा कट रचला. यासाठी त्याने एक मोठा चाकूही खरेदी केला आणि अभिनेत्रीच्या घरात चोरी करण्यासाठी तो शिरला. पद्मिनीची आई इंद्रा यांनी ड्रायव्हरला पाहिले त्यावेळेस त्याने इंद्रावर चाकूने वार केला. आईच्या ओरडण्याचा आवाज ऐकून पद्मिनी बाहेर आली तेव्हा ड्रायव्हरने तिच्याही छातीवर तब्बल 17 वेळा वार केले. वयाच्या 23व्या वर्षी अभिनेत्रीचा या घटनेत मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता.