
Tharala Tar Mag Serial: 'ठरलं तर मग' मालिका गेली तीन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलंय. काही दिवसांपूर्वीच पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. 'ठरलं तर मग' मालिकेच्या टीमलाही ज्योती चांदेकर त्यांच्यातून निघून गेल्याचं दु:ख पचवणे आजही अवघड जातंय. पण शो मस्ट गो ऑन....गेले कित्येक दिवस पूर्णा आजी यांचे पात्र प्रेक्षकांना पाहता येत नव्हते. प्रेक्षकांच्या इच्छेखातर पूर्णा आजी लवकरच पुन्हा आपल्या भेटीला येणार आहे.
नव्या पूर्णा आजी कोण आहेत? | New Purna Aaji
ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी पूर्णा आजीची भूमिका साकारणार आहेत. पूर्णा आजी म्हणजेच रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या,'ठरलं तर मग मालिका माझी आवडती मालिका आहे आणि मी न चुकता पाहते. याच मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारणार आहे. मनात संमिश्र भावना आहेत. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कुणीतरी साकारलेली भूमिका पुढे नेणार आहे. पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर यांच्यासोबत माझी जुनी मैत्री होती. कधी वाटलं नव्हतं ती अशी अचानक सोडून जाईल आणि तिची भूमिका मी साकारेन. कलाकाराने ती भूमिका एका पातळीवर नेऊन ठेवलेली असते. त्या कलाकाराने केलेले काम पुढे न्यायचे थोडे जबाबदारीचे काम आहे. माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करणार आहे. प्रेक्षकांनी तितक्याच दिलदारपणे स्वीकारावे ही इच्छा आहे.'

Photo Credit: Star Pravah Channel
'ठरलं तर मग' मालिकेची टीम भावुक
पूर्णा आजीच्या एण्ट्रीने सेटवरही आनंदाचं वातावरण आहे. सर्व टीमने मिळून रोहिणी हट्टंगडी यांचं मनापासून स्वागत केलं आहे. सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी म्हणाली,"पूर्णा आजीच्या रुपात रोहिणी ताईंना पाहून खूप भरुन आलं. रोहिणी ताईंसोबत काम करताना खूप गोष्टी शिकायला मिळणार आहेत. त्यांच्या रुपात विद्यापीठच आमच्या सेटवर आलंय. रोहिणी ताई म्हणजेच पूर्णा आजीसोबत आता मालिकेची गोष्ट पुढे नेताना आनंद होतोय."
(नक्की वाचा: Shivali Parab Video : शिवाली परबचा तो व्हिडीओ पाहून रितेश देशमुखला लागलं वेड, म्हणाला...)
नव्या पूर्णा आजीच्या एण्ट्रीचा व्हिडीओ पाहिला का?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world