Rinku Rajguru : त्या निळ्या साडीवाल्या बाईनं... रिंकू राजगुरूच्या आशा सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर Video

Rinku Rajguru Asha Movie: रिंकू राजगुरूच्या आशा सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर, पाहिला का व्हिडीओ?

जाहिरात
Read Time: 2 mins
"Rinku Rajguru Asha Movie Trailer: रिंकू राजगुरूच्या आशा सिनेमाचा ट्रेलर"
Asha Movie Trailer

Rinku Rajguru Asha Movie Trailer: अभिनेत्री रिंकू राजगुरू तिच्या 'आशा' सिनेमामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ‘बाई अडलीये…म्हणूनच ती नडलीये' या प्रभावी टॅगलाइनमुळे सिनेमाच्या टीझरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केलीय. टीझरमध्ये रिंकू राजगुरू साकारत असलेली आशा सेविका सायकलवर बसून गावागावांतील लोकांपर्यंत पोहोचते, अशी काहीशी झलक पाहायला मिळाली. या साध्या तरीही परिणामकारक दृश्यांनीच प्रेक्षकांच्या मनात आशा सेविकांच्या प्रवासाबाबत एक वेगळंच कुतूहल निर्माण झालंय. सिनेमाचा ट्रेलर देखील जबरदस्त आहे.

‘चालत रहा पुढे' हे सिनेमातील प्रेरणादायी गाणं देखील प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. आशाच्या संघर्षाला ऊर्जा देणाऱ्या या गाण्याला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळतोय. अनेकांनी आशा सेविकांच्या जिद्दीची आणि धैर्याची स्तुती केलीय. नुकतेच चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा आयुष्यमान भारत – मिशन महाराष्ट्र समिती अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, ज्येष्ठ साहित्यिक, 99व्या आखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील आणि लोढा फाउंडेशनच्या अध्यक्षा मंजू मंगलप्रभात लोढा आदी मान्यवरांसह ‘आशा' सेविका यांच्या उपस्थितीत पार पडला.

'आशा' सिनेमातून उलगडणार वास्तववादी प्रवास

महिलांच्या संघर्षांचा, त्यांच्या जिद्दीचा, समाजाशी सुरू असलेल्या लढ्यांचा संवेदनशील आणि वास्तववादी प्रवास ‘आशा'मधून उलगडत जातो. ट्रेलरमध्ये रिंकू राजगुरूने साकारलेल्या आशाचे अनेक पैलू दिसतात. गावोगावी लोकांच्या आरोग्याची जबाबदारी पेलणे, कुटुंबातील ताणतणावांना सामोरं जाणं, अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहाणं आणि स्वतःचं ध्येय साध्य करण्याची न थकणारी धडपड. तिच्या आयुष्यातील धग, वेदना आणि तळमळ ट्रेलरमध्ये स्पष्टपणे जाणवते.

आशा सिनेमातील तगड स्टारकास्ट

रिंकूसह सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. सामाजिक वास्तव, महिलांवर येणारे अनेक कठोर निर्णय, भावनिक दडपण आणि अस्मितेची लढाई या सर्वांचा प्रभावी संगम चित्रपटात दिसणार आहे. ‘आशा' ही केवळ एका सेविकेची कथा नाही, तर सर्व स्तरांवर दररोज लढणाऱ्या लाखो महिलांची कहाणी आहे, हेच चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरते.

Advertisement

(नक्की वाचा: Pooja Birari Marriage Photos: बांदेकरांची सून! पूजा बिरारी आणि सोहम बांदेकरचं धुमधडाक्यात पार पडलं लग्न)

आशा ही लाखो स्त्रियांची प्रतिनिधी: दिग्दर्शक दीपक पाटील

दिग्दर्शक दीपक पाटील म्हणतात, “‘आशा' हा केवळ एका आरोग्य सेविकेचा प्रवास नाही. ती त्या लाखो स्त्रियांची प्रतिनिधी आहे, ज्या आयुष्यभर इतरांसाठी झिजतात, स्वतःच्या भीतींवर मात करतात आणि कुठल्याही परिस्थितीत हार मानत नाहीत. या चित्रपटातून आम्ही त्या अनामिक योद्ध्यांना प्रकाशात आणू इच्छितो. तिचं सत्य, तिचा वेदनादायी तरीही प्रेरणादायी प्रवास आम्ही प्रामाणिकपणे मांडला आहे.”

(नक्की वाचा: Prajakta Gaikwad Kanyadan: अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचं वास्तूतज्ज्ञांनी का केलं कन्यादान? पाहा VIDEO)

आशा सिनेमाचा ट्रेलर | Asha Movie Trailer | Rinku Rajguru

Advertisement

‘आशा' सिनेमा येत्या 19 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टीझर, गाणं आणि ट्रेलरमुळे प्रेक्षकांमध्ये अधिक उत्सुकता निर्माण झालीय.