Raakh Web Series Controversy: सध्याच्या डिजिटल युगात ओटीटी प्लॅटफॉर्मवर सत्य घटनांवर आधारित क्राईम थ्रिलर सीरिजची मोठी लाट आली आहे. मात्र, ऐतिहासिक किंवा खऱ्या गुन्ह्यांवर आधारित कथा पडद्यावर मांडताना सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली नेमके काय दाखवले जात आहे, यावरून आता नवा वाद पेटला आहे. नुकतीच रिलीज झालेली राख ही वेब सीरिज आता अशाच एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
देशातील एका सर्वात चर्चिलेल्या जुन्या गुन्हेगारी प्रकरणावर आधारित असलेल्या या सीरिजवर थेट इतिहास बदलल्याचा आणि विशिष्ट अजेंडा चालवल्याचा गंभीर आरोप होत आहे. सोशल मीडियावर या सीरिजला हिंदू विरोधी म्हणत जोरदार विरोध सुरू झाला असून, हा वाद आता चांगलाच तापला आहे.
काय आहे राख वेब सीरिज?
प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 12 जून 2026 रोजी राख ही 8 एपिसोडची क्राईम थ्रिलर वेब सीरिज रिलीज झाली आहे. प्रोसित रॉय यांनी दिग्दर्शित केलेल्या या सीरिजमध्ये अली फजल, सोनाली बेंद्रे, आमिर बशीर आणि राकेश बेदी यांसारख्या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
ही सीरिज 26 ऑगस्ट 1978 रोजी दिल्लीत घडलेल्या अत्यंत कुख्यात रंगा आणि बिल्ला अपहरण आणि हत्याकांड प्रकरणावर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. एका रेडिओ कार्यक्रमाला जात असताना सुमन आणि साहिल अरोरा या दोन अल्पवयीन भावंडांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या ऐतिहासिक सत्य घटनेवरून प्रेरित होऊन ही सीरिज तयार करण्यात आली आहे.
जाती आणि धर्माचे संदर्भ बदलल्याचा आरोप
या सीरिजवर सर्वात मोठा आक्षेप हा घेतला जात आहे की, लेखकांनी खऱ्या घटनेतील पात्रांची जात आणि धर्म पूर्णपणे बदलून कथा मांडली आहे. खऱ्या घटनेमध्ये दोन्ही मुख्य आरोपी हे शीख समुदायाचे होते, ज्यांची नावे कुलजीत सिंह आणि जसबीर सिंह उर्फ रंगा आणि बिल्ला अशी होती.
मात्र, या सीरिजमध्ये त्या खलनायकांना हिंदू नाव देऊन बाबू आणि रज्जो असे दाखवण्यात आले आहे, ज्यातील एकाला हरयाणवी तर दुसऱ्याला महाराष्ट्रीयन दाखवले आहे. दुसरीकडे, खऱ्या घटनेत मुलांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाबूलाल नावाच्या व्यक्तीचे पात्र सीरिजमध्ये बदलून त्याचे नाव सलीम असे करण्यात आले आहे.
भीम मीम नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न
नेटकऱ्यांनी आणि समीक्षकांनी असा आरोप केला आहे की, सीरिजच्या लेखकांनी जाणीवपूर्वक समाजात जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारा नॅरेटिव्ह दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सीरिजमध्ये मुख्य तपास अधिकारी म्हणून अली फजल याने जयप्रकाश जाटव नावाच्या दलित पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे, ज्याच्या घरात ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो दाखवले आहेत आणि त्याचे वडील जय भीमच्या घोषणा देताना दिसतात.
या तपास अधिकाऱ्याचा मुख्य मदतनीस जावेद मुर्तझा नावाचा मुस्लिम अधिकारी दाखवला आहे, तर पोलीस दलातील सर्वात आळशी आणि अकार्यक्षम हवालदार हा मिश्रा आडनावाचा म्हणजेच ब्राह्मण दाखवण्यात आला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणात निर्भीड पत्रकार म्हणून एका मुस्लिम महिलेचे पात्र उभे केले आहे.
( नक्की वाचा : Black Warrant : 40 वर्षांनी पुन्हा ताजं झालेलं रंगा-बिल्ला प्रकरण काय आहे? त्यानंतर दिल्ली कशी बदलली? )
खऱ्या तपासातील वास्तव काय?
सोशल मीडिया युजर्सनी जुने रेकॉर्ड्स शेअर करत असा दावा केला आहे की, 1978 मधील मूळ तपास पथकात असा कोणताही जातीय किंवा धार्मिक अँगल नव्हता. खऱ्या केसमध्ये मुख्य तपास अधिकारी व्ही पी गुप्ता हे होते, त्यांचे सहाय्यक राम चंदर होते आणि तत्कालीन पोलीस आयुक्त जे एन चतुर्वेदी होते. मूळ केस डायरी किंवा तपासात कुठेही अशा पद्धतीचा भेदभाव किंवा संदर्भ नव्हता. मात्र, सीरिजमध्ये दाखवलेला हा प्रकार म्हणजे डाव्या विचारसरणीचा अजेंडा असून खऱ्या इतिहासाची मोडतोड करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राहुल त्यागी आणि स्किन डॉक्टर यांसारख्या प्रसिद्ध सोशल मीडिया युजर्सनी केला आहे.
The 1978 Ranga-Billa case involved the brutal kidnapping and murder of teenage siblings Geeta and Sanjay Chopra in Delhi by career criminals Kuljeet Singh (Ranga) and Jasbir Singh (Billa).
— THE SKIN DOCTOR (@theskindoctor13) June 17, 2026
The horrific crime shocked the nation, leading to a massive manhunt and the swift… pic.twitter.com/0Jiz0PD5bl
So, Prime Video made a series inspired by Ranga and Billa the infamous killers and kidnappers called Raakh. In this series the chief investigator played by Ali Fazal is shown as a Dalit whose father is a retired hawaldar who faced caste discrimination. Ali Fazal's character keeps…
— Rahul Tyagi (@rahulastic) June 13, 2026
क्रिएटिव्ह फ्रीडमच्या नावाखाली प्रोपोगंडा
या सीरिजचे लेखक अनुषा नंदकुमार आणि संदीप साकेत यांच्यावर सध्या सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. सिनेमॅटिक लिबर्टी किंवा सर्जनशील स्वातंत्र्य हे कथेला अधिक प्रभावी करण्यासाठी असते, इतिहास बदलण्यासाठी नाही, अशी भूमिका नेटकऱ्यांनी घेतली आहे. प्राइम व्हिडिओ यापूर्वीही अनेकदा खऱ्या घटना फिरवून दाखवण्यात आघाडीवर राहिला असल्याचा आरोप करत युजर्स आता या सीरिजवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. सत्य घटना सांगून त्यात स्वतःच्या सोयीनुसार जातीय रंग भरणे कितपत योग्य आहे, असा सवाल या निमित्ताने पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world