नेटफ्लिक्सवरील 'ब्लॅक वॉरंट' (Black Warrant) या गाजत असलेल्या वेब सीरिजमधील एक संपूर्ण भाग रंगा-बिल्ला (Ranga-Billa ) खटल्यावर आहे. कुलजीत उर्फ रंगा खूश आणि जसबीर सिंग उर्फ बंगाली उर्फ बिल्ला या दोन जणांना अल्पवयीन मुलांच्या हत्या आणि बलात्कार प्रकरणात फाशी देण्यात आली होती. चाळीस वर्षांपूर्वी (31 जानेवारी 1982) दिल्लीतील तिहार जेलमध्ये या दोघांना फाशी झाली. 'ब्लॅक वॉरंट वेब सीरिज'नं पुन्हा एकदा 40 वर्षांपूर्वी संपूर्ण देश हादरवणाऱ्या रंगा-बिल्ला प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. या प्रकरणाची धग केंद्रातील तत्कालीन मोरारजी देसाई सरकारलाही जाणवली. त्याचबरोबर या घटनेनंतर राजधानी दिल्लीची ओळख बदलली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय घडलं होतं?
26 ऑगस्ट 1978 रोजी नौदल अधिकारी मदन मोहन चोप्रा आणि रोमा चोप्रा यांची मुलं गीता आणि संजय यांनी नवी दिल्लीतील धौला कुआं भागातील त्यांचं निवासस्थान सोडलं त्यावेळी संध्याकाळचे 6 वाजून 15 मिनिट झाले होते. ती ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील संध्याकाळ होती. दिल्लीत त्या दिवशी ढगाळ वातावरण होतं. उत्तर भारतामधील मोठ्या भागाला पूराचा इशारा देण्यात आला होता.
चोप्रा भावंडांच्या प्लॅनमध्ये पावसानं मोठा अडथळा निर्माण केला होता. त्यांना संसद मार्गावरील ऑल इंडिया रेडिओ ( All India Radio) च्या कार्यालयात जायचं होतं. त्यावेळी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या गीताला रेडिओवरील युवा वाणी या कार्यक्रमात सहभागी व्हायचं होतं. तिचा भाऊ संजय देखील त्या कार्यक्रमात सहभागी होणार होता. त्याच दिवशी रात्री 8 वाजता तो कार्यक्रम होणार होता.
चोप्रा भावंडांना जोरदार सुरु असलेल्या पावसामुळे त्यांच्या घरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या संसद मार्गापर्यंत चालत जाणे अशक्य बनले होते. त्यांना सुरुवातीला डॉ. एमएस नंदा यांच्या कारमध्ये लिफ्ट मिळाली. नंदा यांना त्यांना गोला डाक खानापाशी सोडलं. त्या ठिकाणाहून रेडिओचं कार्यालय एक किलोमीटर अंतरावत होतं. कार्यक्रम संपल्यावर रात्री 9 वाजता त्यांचे वडिल दोघांना रेडिओ ऑफिसमधून पिक-अप करणार होते.
दोन दिवसांनंतर म्हणजे 28 ऑगस्ट 1978 रोजी रिजच्या दाट झाडीमध्ये दोन मुलांचे कुजलेले मृतदेह एका जाणाऱ्या गुराख्याला आढळले.
( नक्की वाचा : Ujjwal Nikam Story : जळगावचे उज्ज्वल निकम देशातील सर्वात चर्चित सरकारी वकील कसे बनले? )
पांढर्या रंगाची फियाट
डॉ. नंदा यांनी चोप्रा भावंडांना गोले डाका खाना परिसरात ड्रॉप केले. त्यांनंतर काही जणांनी त्या भागात एक पांढऱ्या रंगाची फियाट पाहिली. त्या कारमध्ये काहीतरी संशयास्पद घडत होते.
कंट्रोल रुममनं त्या भागात गस्त घातल असलेल्या पथकाा वायरलेसवरुन अलर्ट पाठवला. हा अलर्ट जारी होताच याच पद्धतीची तक्रार दिल्लीतील राजींदर नगर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली.
इंद्रजीत सिंग या 23 वर्षांच्या ज्युनिअर इंजिनिअरनं त्यावेळी ड्यूटीवर तैनात असलेले अधिकारी हरभजन सिंग यांच्याकडं ही तक्रार केली होती. त्यांनी एक फियाट अत्यंत वेगानं त्यांच्या स्कूटरला ओव्हरटेक करत लोहिया हॉस्पिटलच्या दिशेनं जाताना पाहिलं होतं. त्या कारमधून एका मुलीच्या किंकाळ्या त्यांनी ऐकल्या होत्या.
इंद्रजीत सिंग यांनी त्यांची स्कुटर फियाटच्या जवळ नेली त्यावेळी त्यांनी दोन माणसं त्या कारच्या पुढच्या सिटवर बसलेली पाहिली. एक मुलगा आणि मुलगी मागच्या सिटवर होते. मुलगी कार ड्रायव्हरचे केसं ओढत होती.इंद्रजीत यांना कारच्या खिडकीजवळ पाहताच मुलानं त्याच्या रक्तानं माखलेल्या टीशर्टकडं इशारा केला. त्या कारनं लाल दिव्याचा सिग्नल तोडला आणि ती वेगानं पुढं निघून गेली.
त्यानंतर पोलिसांचा तपास सुरु झाला. ही घटना उघड होताच त्यांना नागरिकांच्या तीव्र रोषाचा सामना करावा लागला. गीता आणि संजय ही भावंड गायब झाल्यानंतर दोन दिवसांनी पोलिसांना त्यांचे मृतदेह सापडले. गीतावर बलात्कार देखील झाला होता.
दोन निरपराध किशोरवयीन मुलांच्या थंड डोक्यानं, निर्दयी आणि क्रूर पद्धतीनं केलेल्या या हत्येच्या शिक्षेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयानं सांगितलं की, 'बिल्ला आणि रंगा यांना गुन्हा केल्याचा पाशवी आनंद होता.त्यामुळेच त्यांना फाशीपेक्षा अन्य कोणतीही शिक्षा देणे हे न्याय प्रक्रियेचे अपयश असेल.'
रंगा-बिल्लाला कसं पकडलं?
गीता आणि संजयच्या हत्येनंतर दोन आठवडे रंगा बिल्ला फरार होते. ते सतत त्यांचा ठावठिकाणा बदलत होते. अखेर त्यांच्याच एका चुकीमुळे पकडले गेले. दोन आठवड्यानं रंगा -बिल्लाने आग्राहून दिल्लीला जाणारी काल्का मेल पकडली. त्यावेळी ते चुकून मिल्ट्री कंपार्टमेंटमध्ये शिरले.
लान्स नायक गुरजीत सिंग आणि एव्ही शेट्टी यांनी त्यांना ओळखपत्र मागितले. त्यावेळी गुरुजीत सिंग यांना या दोघांबद्दल संशय आला. त्यांच्याकडं एका हिंदी वृत्तपत्राची प्रत देखील होती. त्यामध्ये 1978 साली संपूर्ण देशाला हव्या असणाऱ्या या दोन गुन्हेगारांचे फोटो होते.
पहाटे 3.30 वाजता रेल्वे दिल्ली स्टेशनमध्ये दाखल झाली त्यावेळी रंगा आणि बिल्ला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्या दोघांकडं कृपाण, एक जिवंत काडतूस होतं. तसंच रक्तानं माखलेले कपडे देखील त्यांच्याजवळ सापडले.
आणि अशाप्रकारे, 1978 साली रंगा-बिल्ला तिहारमधील फाशीच्या खोलीत पोहोचले. जेलर सुनील गुप्ता त्यावेळी तेथील प्रभारी होती. गुप्ता यांच्या कार्यकाळात तिहार जेलमधील ते पहिलेच फाशीचे प्रकरण होते. सुनील गुप्ता यांच्या आयुष्यावर सुनेत्रा चौधरी यांनी लिहिलेल्या 'Black Warrant: Confessions of a Tihar Jailer (Roli Books, 2019)' पुस्तकावर नेटफ्लिक्सची सीरिज आधारित आहे.
तिहारमधील फाशीची कोठी
सुनील गुप्ता यांनी त्यांच्या पुस्तकात रंगा आणि बिल्लाबद्दल लिहिले आहे. या घटनेच्या अनेक दशकांनंतरही त्यांचे चेहरे माझ्या लक्षात आहेत, असं ते सांगता. गुप्ता यांनी पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार, रंगाचे तिहार जेलमधील नाव 'रंगा खुश'होते. ते त्याच्या व्यक्तिमत्वाचे शब्दश: प्रतीक होते.
रंगा 24 वर्षांचा 6 फूट उंचीचा तरुण होता. तो जेलमध्ये सतत अगदी फाशीच्या दोरखंडावरही आनंदी होता. तो सतत रंगा खुश, रंगा खुश हे वाक्य म्हणत असे. ते त्यानं एका सिनेमातून उचललं होतं. तो खरोखर आनंदी होता की आनंदी असल्याचं भासवत होता, याची मला खात्री नाही, असं गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे.
बिल्ला रंगाच्या अगदी उलट होता. तो बिल्लापेक्षा बराच बुटका होता. त्याची उंची 5 फूट 5 इंच होती.रंगा जेलमधील रोजच्या दिनक्रमात सहभागी होत असे तर बिल्ला कुणाशी बोलत नसे. आपल्याला या प्रकरणात चुकीच्या पद्धतीनं अडकवल्याचा त्याचा दावा होता. पण, सर्व न्यायालयानं त्याच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले होते. त्याच्या आणि मृतांच्या रक्ताच्या फॉरेन्सिक चाचणीनंतर गुन्हा सिद्ध झाला होता. पण बिल्लानं शेवटच्या क्षणापर्यंत आपण निर्देष असल्याचा दावा केला, असं गुप्ता यांनी त्यांच्या पुस्तकात म्हंटलं आहे.
तर, रंगाने आपण बिल्लाच्या मदतीनं गीता आणि संजयचे खंडणीसाठी अपहरण केले. पण, आपला बलात्कार करण्याचा हेतू नव्हता, असं शेवटपर्यंत सांगितलं, असं गुप्ता यांनी पुस्तकात म्हंटलं आहे. बिल्लानं गीताला पाहिल्यानंतर त्याच्यातील नराधम जागा झाला आणि त्यानं बलात्कार आणि हत्या केली असा रंगाचा दावा होता, असा उल्लेख गुप्ता यांच्या पुस्तकात आहे.
आणिबाणीच्या आंदोलनानंतर केंद्रात सत्तेवर आलेल्या जनता पक्षाचा पुढील निवडणुकीत पराभव झाला. दिल्लीमधील खालावलेली कायदा आणि सूव्यवस्था त्यांच्या पराभवाचं एक कारण ठरलं.
कशी झाली फाशी?
गीता आणि संजय चोप्राच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर चार वर्षांनी 31 जानेवारी 1982 रोजी रंगा-बिल्लाला फाशी झाली. फाशी देण्याच्या एक आठवडा आधी या दोघांना फाशीच्या कोठडीमध्ये हलवण्यात आले होते. फाशीच्या कोठडीमधील बाहेरच्या कोणत्याही व्यक्तींना आतमध्ये कशा पद्धतीनं तयारी सुरु आहे, याची कोणतीही माहिती नव्हती.
फाशी देण्यापूर्वी या दोघांनाही शेवटची इच्छा विचारण्यात आली होती. फाशी देण्याच्या दहा मिनिटे आधी त्यांचा चेहरा कपड्यानं झाकण्यात आला. त्यानंतर त्यांना फाशीच्या दोरखंडाजवळ नेण्यात आले.
दिल्लीमध्ये तेव्हा फाशीच्या ठिकाणी फक्त तुरुंगातील अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याची परवानगी होती. त्यामुळे रंगा आणि बिल्लाला फाशीच्या ठिकाणी नेण्यात आले त्यावेळी तिथं तुरुंगातील अधिकाऱ्यांशिवाय कुणीही उपस्थित नव्हते. जेलचे रस्ते बंद करण्यात आले होते. तसंच फाशीच्या योजनेची कोणतीही माहिती माध्यमांना देण्यात आलेली नव्हती.
रंगा आणि बिल्लाच्या कुटुंबीयांनी त्यांचे मृतदेह घेण्यास नकार दिला. तुरुंगातील कर्मचाऱ्यांनीच दोघांवर अंत्यसंस्कार केले.
2 तास जिवंत होता रंगा
या पुस्तकानुसार 31 जानेवारी 1982 रोजी सकाळी रंगा आणि बिल्लाला फाशी देण्यात आली. त्यावेळी जेल अधिकारी आणि जल्लाद (फकीरा आणि कल्लू) यांची या दोघांचा दोरखंडावर लटकवल्यानंतर मृत्यू झाला अशी समजूत होती. त्यामुळे सर्वजण तिथून निघून गेले. दोन तासानंतर फाशीच्या पुढील प्रक्रिया झाली.
रंगा जिवंत असल्याचं कळताच जेलमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर पुन्हा एकदा जल्लादानी रंगाच्या गळ्यात गळफास अडकवून त्याला पुन्हा खाली खेचलं. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. याच कारणामुळे फाशीची शिक्षा देण्यापूर्वी दोषी व्यक्तीच्या वजनाचे डमी तयार करुन त्यांना अनेकदा फाशी दिली जाते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world