Ambernath News : अंबरनाथच्या धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहात शनिवारी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या 'द दमयंती दामले' नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. मात्र या प्रयोगावेळी मध्यंतरानंतर नाट्यगृहाचा पडदाच उघडत नसल्यानं प्रयोग तब्बल अर्धा तास रखडला. यावेळी नाट्यगृहात कुणीही तंत्रज्ञ हजर नसल्यानं कलाकारांनी हाताने पडदा उघडत प्रयोग सुरू केला. संतापजनक बाब म्हणजे पडद्यात बिघाड होण्यापूर्वी नाट्यगृहाच्या साउंड सिस्टीममध्येही बिघाड झाला होता.
मात्र नाटकाच्या साउंड टीमने तो दुरुस्त करत नाटक पुढे सुरू केलं. नाटकाचा प्रयोग संपल्यावरही अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी स्वतःच्या हाताने पडदा बंद केला. त्यामुळं इतका गाजावाजा करून सुरू झालेल्या नाट्यगृहात अंबरनाथ पालिकेला नाटकांच्या प्रयोगावेळी साधे तंत्रज्ञ ठेवता येत नाही का? असा संतप्त सवाल नाट्यप्रेमींनी केला आहे. नाटक संपल्यावर तिथे आलेल्या तंत्रज्ञाने पडद्यातला बिघाड दुरुस्त करण्याचं काम सुरू केलं. या सगळ्या प्रकारामुळे कलाकार आणि शेकडो नाट्यरसिकांसमोर अंबरनाथ पालिकेची मात्र चांगलीच नाचक्की झाली.
अंबरनाथ-बदलापूरकरांच्या पदरी निराशाच...
अंबरनाथ-बदलापूर ही शहरं झपाट्याने वाढत आहेत. येथे मोठमोठे ब्रँड दाखल झाले आहेत. मात्र येथे चांगल्या दर्जाचं थिएटर आणि नाट्यगृह नसल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त केली जात होती. दरम्यान २०२५ च्या ऑक्टोबरमध्ये अंबरनाथमध्ये धर्मवारी आनंद दिघे नाट्यमंदिराची उभारणी करण्यात आली. त्यामुळे अंबरनाथ-बदलापुरातील नाट्यप्रेमींनी आनंद व्यक्त केला. मात्र प्रत्यक्षात नवं नाट्यगृह बांधूनही येथील साध्या साध्या गोष्टींमध्ये होणाऱ्या अडचणींमुळे अंबरनाथ-बदलापूरकरांच्या पदरी निराशाच पडली आहे.