Bigg Boss Marathi 6 Grand Finale: १०० दिवसांचा नाट्यमय प्रवास, घरातील वाद, मैत्री आणि खेळाचे नवनवे पैलू उलगडल्यानंतर अखेर ‘बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वाचा आज निकाल लागणार आहे. तन्वी कोलते, अनुश्री माने, विशाल कोटियन, राकेश बापट आणि दिपाली सय्यद या पाच प्रबळ दावेदारांमध्ये ही चुरस पाहायला मिळत आहे. यांपैकी बिग बॉस मराठीची ट्रॉफी कोण उंचावणार? याची सर्वांनाच मोठी उत्सुकता आहे. मात्र, महाअंतिम सोहळ्याच्या सुरुवातीलाच बिग बॉस मराठीच्या घरात मोठा ट्वीस्ट पाहायला मिळाला आहे.
राडा, वादविवाद अन् भावुक क्षणांचे अनुभव देणारा गेल्या 100 दिवसांपासून सुरु असलेला बिग बॉस मराठीचा विजेता आज ठरणार आहे. त्याआधी घरातील टॉप-५ स्पर्धकांपैकी कोण पहिलं एलिमिनेट होईल, कोणाचा प्रवास संपेल याबाबत चॅनेलकडून मोठी अपडेट समोर आली आहे. कलर्स मराठीने नुकताच एक खास प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये रितेश देशमुख घरातील सदस्यांना मनी बॅगची ऑफर देतो.
कार्यक्रमाच्या परंपरेनुसार, अंतिम पाच सदस्यांना 'मनी बॅग'ची ऑफर देण्यात आली होती. यंदा या बॅगेत ५ लाख रुपयांची रक्कम आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये राकेश बापट बझर वाजवण्यासाठी पुढे सरसावताना दिसत आहे. यामुळे चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले. या प्रोमोमुळे राकेश बापट पैशाची बॅग घेऊन कार्यक्रमातून बाहेर पडल्याची चर्चा सुरु झाली आहे.
मात्र प्रत्यक्षात राकेशने ही ऑफर स्वीकारली नसल्याचे समजते. केवळ प्रेक्षकांची उत्सुकता ताणण्यासाठी हा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, वोटिंग ट्रेंड्स आणि सोशल मीडियावरील चर्चेनुसार, दीपालीला पाचवे स्थान मिळाले आहे. तिच्या एक्झिटनंतर आता घरात अनुश्री-तन्वी विरुद्ध विशाल-राकेश असा दोन गटांमधला समतोल पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, रितेश देशमुखच्या खुसखुशीत सूत्रसंचालनाने रंगणारा हा सोहळा रात्री ८ वाजता 'कलर्स मराठी'वर रंगणार आहे. या पाच जणांपैकी नक्की कोणाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जातो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.