Veteran Artist Support: रुपेरी पडद्यावर झळकणाऱ्या आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अनेक दिग्गज कलाकारांचे आयुष्य प्रसिद्धीचा काळ ओसरल्यानंतर अंधारात जाते. अशा दुर्लक्षित आणि ज्येष्ठ कलाकारांना मदतीचा हात देण्यासाठी सिने आर्टिस्ट वेलफेअर ट्रस्टने (CAWT) उचललेले पाऊल अत्यंत कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी काढले आहेत. केवळ कौतुकच नाही, तर या कलाकारांच्या कल्याणासाठी त्यांनी कोकणातील सावंतवाडी येथील आपली स्वतःची 1 एकर जागा देण्याची मोठी घोषणाही यावेळी केली आहे.
ज्येष्ठ कलाकारांच्या सन्मानार्थ विशेष सोहळा
मुंबईत सिने आर्टिस्ट वेलफेअर ट्रस्ट आणि सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या संस्थेच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या दिलीप कुमार, सुनील दत्त, मिथुन चक्रवर्ती, आशा पारेख, जॉनी लिव्हर अशा महान कलाकारांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या माहिती फलकाचे अनावरण रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या व्यासपीठावरून बोलताना त्यांनी कलाकारांच्या पडद्यामागच्या संघर्षावर प्रकाश टाकला.
प्रसिद्धीच्या झगमगाटामागचे दाहक वास्तव
रविंद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सिनेक्षेत्रात मिळणारा पैसा आणि ग्लॅमर याची चर्चा नेहमीच होते. मात्र, प्रत्येक कलाकाराचा एक सुवर्णकाळ असतो आणि तो ओसरला की अनेक कलाकारांकडे समाज दुर्लक्ष करतो. सध्या अभिनय क्षेत्रात असे सुमारे 9000 ते 10000 कलाकार आहेत, ज्यांचे दैनंदिन जीवन अतिशय हलाखीचे आहे. आजारपण आणि आर्थिक चणचण यांसारख्या समस्यांनी हे कलाकार खचले आहेत. त्यांच्या आयुष्यातील हे दुःख दूर करण्यासाठी सीएडब्ल्यूटी (CAWT) सारखी संस्था जो आधार देत आहे, तो खरोखरच महान आहे.
( नक्की वाचा : Vinod Kambli: विनोद कांबळीच्या संघर्षाचा आईस्क्रीम कंपनीकडून सौदा? सोशल मीडियावर तीव्र संताप, काय आहे प्रकरण? )
मुख्यमंत्र्यांकडे मांडणार प्रलंबित प्रश्न
सीएडब्ल्यूटीच्या अध्यक्षा प्रीती सप्रू यांनी ज्येष्ठ कलाकार आणि चित्रपट क्षेत्रातील कामगारांना भेडसावणाऱ्या सामाजिक समस्यांची माहिती रविंद्र चव्हाण यांना दिली. या प्रश्नांची गंभीर दखल घेत चव्हाण यांनी आश्वासन दिले की, कलाकारांच्या या समस्यांबाबत मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याशी सविस्तर चर्चा करेन. हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी सरकार दरबारी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
कोकणात कलाकारांसाठी हक्काची जागा
कलाकारांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करताना रविंद्र चव्हाण यांनी एक मोठी वैयक्तिक घोषणा केली. ज्येष्ठ कलाकारांच्या निवासासाठी किंवा इतर कल्याणकारी प्रकल्पांसाठी कोकणातील केसरी, सावंतवाडी येथील आपली स्वतःची 1 एकर जागा देण्यास मी तयार आहे, असे त्यांनी जाहीर केले. या घोषणेमुळे ज्येष्ठ कलाकारांसाठी एक हक्काचा आधार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
( नक्की वाचा : IPL च्या झगमगाटात एकमेव मराठी टक्का! 40 स्टार्टअप्स उभारणाऱ्या धुळ्याच्या धुरंधरनं कशी विकत घेतली स्वतःची टीम? )
दिग्गज कलाकारांची उपस्थिती
या सोहळ्याला चित्रपट सृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांनी हजेरी लावली होती. यामध्ये संस्थेच्या अध्यक्षा प्रीती सप्रू, सचिव संभावना सेठ, खजिनदार दीपक पराशर यांच्यासह राजपाल यादव, मनोज जोशी, मुकेश ऋषी, आयुब खान आणि अभिनेत्री कुनिका यांसारख्या अनेक प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होत्या. या सर्वांनी रविंद्र चव्हाण यांच्या संवेदनशील भूमिकेचे आणि त्यांनी दिलेल्या मदतीच्या आश्वासनाचे स्वागत केले आहे.