जाहिरात

Vinod Kambli: विनोद कांबळीच्या संघर्षाचा आईस्क्रीम कंपनीकडून सौदा? सोशल मीडियावर तीव्र संताप, काय आहे प्रकरण?

Vinod Kambli Ice Cream Ad: माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीच्या आयुष्यातील संघर्षाचा वापर करून आईस्क्रीमची विक्री करण्याचा प्रयत्न एका प्रसिद्ध ब्रँडला चांगलाच महागात पडताना दिसत आहे.

Vinod Kambli: विनोद कांबळीच्या संघर्षाचा आईस्क्रीम कंपनीकडून सौदा? सोशल मीडियावर तीव्र संताप, काय आहे प्रकरण?
Vinod Kambli : सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मुंबई:

Vinod Kambli Ice Cream Ad: माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीच्या आयुष्यातील संघर्षाचा वापर करून आईस्क्रीमची विक्री करण्याचा प्रयत्न एका प्रसिद्ध ब्रँडला चांगलाच महागात पडताना दिसत आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. याच पार्श्वभूमीवर दिनशॉ नावाच्या आईस्क्रीम ब्रँडने कांबळीला घेऊन एक नवी जाहिरात तयार केली आहे. या जाहिरातीला त्यांनी कमबॅक असे नाव दिले असून, त्यावरून आता सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

नेमकी जाहिरात काय आहे?

या जाहिरातीमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, ज्यांना आयुष्यात थोडे कमी मिळाले, ते थोडे जास्त मिळवण्यास पात्र आहेत. ही संकल्पना आईस्क्रीम कोनच्या शेवटच्या भागातील एक्स्ट्रा चॉकलेट टिपशी जोडण्यात आली आहे. कांबळीच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष आणि त्यांना मिळालेल्या संधी यावर भाष्य करण्याचा प्रयत्न यातून केला गेला आहे. मात्र, चाहत्यांना ही तुलना अजिबात आवडलेली नाही.

( नक्की वाचा : IPL च्या झगमगाटात एकमेव मराठी टक्का! 40 स्टार्टअप्स उभारणाऱ्या धुळ्याच्या धुरंधरनं कशी विकत घेतली स्वतःची टीम? )
 

चाहत्यांचा संताप आणि मार्केटिंगवर टीका

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी संबंधित ब्रँडवर जोरदार टीका केली आहे. कांबळीची खालावलेली आर्थिक स्थिती, त्यांची प्रकृती आणि त्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंगांचा वापर आईस्क्रीम विकण्यासाठी करणे हे अत्यंत असंवेदनशील असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. ज्या खेळाडूने देशासाठी मोठे विक्रम प्रस्थापित केले, त्याच्या परिस्थितीचे भांडवल करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणे चुकीचे असल्याची भावना चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

( नक्की वाचा : IPL 2026 : मैदानात अनर्थ घडला, पण पुढच्या 11 मिनिटांत जे झालं तो चमत्कारच! एन्गिडीसाठी दिल्ली पोलिसांनी... )

ब्रँडने काय केला खुलासा

या वादावर जाहिरात मोहिमेचे क्रिएटिव्ह लीड गुंजन गाबा यांनी आपली बाजू मांडली आहे. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, या जाहिरातीला मोठा प्रतिसाद मिळत असून जवळपास 95 टक्के लोकांना ती आवडली आहे. कांबळीची जिद्द आणि आयुष्यातील छोट्या आनंदांना साजरे करणे हाच यामागचा मुख्य हेतू होता, असे स्पष्टीकरण कंपनीच्या वतीने देण्यात आले आहे.

संवेदनशीलतेचा अभाव की व्यावसायिक धोरण

विनोद कांबळीच्या या जाहिरातीमुळे जाहिरात विश्वात एक नवी चर्चा सुरू झाली आहे. एखाद्या व्यक्तीच्या वाईट काळाचा वापर मार्केटिंगसाठी करणे हे किती योग्य आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जाहिरात बनवणाऱ्यांचा हेतू कदाचित चांगली असली तरी, ती ज्या पद्धतीने सादर केली गेली, त्यामुळे ब्रँडचे कौतुक होण्याऐवजी त्यांच्यावर टीका होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

इथे पाहा VIDEO

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com