1 Crore Fees Bollywood News: बॉलिवूडमध्ये आज जेथे अभिनेत्री-अभिनेते एका सिनेमासाठी कोट्यवधी रुपये मानधन घेतात, तेथे एक काळ असा होता जेव्हा इतक्या मोठ्या रकमेची कल्पना करणेही कठीण होते. पण या ट्रेंडची सुरुवात एका बड्या सुपरस्टारने केली. या सुपरस्टारने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आणि निर्मात्यांना हिट सिनेमे देऊन मालामाल केले. बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन हे असे पहिले कलाकार होते ज्यांना एका सिनेमासाठी 1 कोटी रुपयांचे मानधन ऑफर करण्यात आले होते.
अमिताभ बच्चन ठरले सर्वात महागडे अभिनेते
ही घटना 1990 सालातील आहे, जेव्हा फिल्ममेकर के.सी. बोकाडिया त्यांच्या 'आज का अर्जुन' या सिनेमासाठी बिग बींना साइन करू इच्छित होते. के.सी. बोकाडिया लवकरच त्यांचा 'तीन बेगम' हा सिनेमाही घेऊन येत आहेत. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान के.सी. बोकाडिया यांनी अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित एक ऐतिहासिक किस्सा एनडीटीव्हीशी शेअर केला. त्यांनी दावा केला की, ते बॉलिवूडचे असे पहिले निर्माते होते ज्यांनी अमिताभ बच्चन यांना सर्वात महागडा अभिनेता बनवले होते.
अमिताभ बच्चन यांचे मानधन 70 लाख ते 80 लाख रुपये
त्या काळात अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता शिखरावर होती. निर्माते के.सी. बोकाडिया त्यांना 'आज का अर्जुन' सिनेमात घेण्यासाठी कोणतीही किंमत द्यायला तयार होते. त्या दिवसांत अमिताभ बच्चन यांचे मानधन 70 ते 80 लाख रुपये होते. एके दिवशी बोकाडिया एका निर्मात्यासोबत बसले होते. त्यांच्यासोबत अमिताभ बच्चनही होते. बोलता बोलता बोकाडिया यांनी बिग बींना सांगितले की, मला तुमच्यासोबत सिनेमा करायचा आहे. अमिताभ बच्चन यांनीही होकार दिला.
(नक्की वाचा: Annu Kapoor: 'ओम पुरींनी माझ्या बहिणीचे आयुष्य उद्ध्वस्त केले'; अन्नू कपूर यांनी सांगितले सख्ख्या बहिणीचे दुःख)
स्क्रिप्ट न वाचताच सिनेमाला दिली संमतीनंतर मानधनाचा विषय निघाला, तेव्हा के.सी. बोकाडिया यांनी अमिताभ बच्चन यांना सांगितले की, तुमचे मानधन 1 कोटी रुपये असायला हवे. हे ऐकून अमिताभ बच्चनही काही काळ स्तब्ध झाले. आश्चर्याची बाब म्हणजे बिग बींनी 'आज का अर्जुन' करण्यासाठी स्क्रिप्ट न वाचता आणि दिग्दर्शकाचे नाव जाणून न घेताच होकार दिला होता. बोकाडिया यांनी त्यांना 1 कोटी रुपयांची ऑफर दिली, जी त्या काळी बॉलिवूडच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली होती.
Photo Credit: NDTV Marathi
अमिताभ बच्चन ठरले आदर्श
'आज का अर्जुन' हा सिनेमा पुढे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आणि प्रेक्षकांनीही त्यास उत्तम प्रतिसाद दिला. या सिनेमासह बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या मानधनाबाबत एका नव्या युगाची सुरुवात झाली. आजच्या काळात जिथे अनेक अभिनेते 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त मानधन घेतात, तिथे अमिताभ बच्चन यांचे हे पाऊल त्या काळात एक आदर्श ठरले.