Ranveer Singh Banned: फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजचे 4 लाखांहून अधिक सदस्य रणवीर सिंहसोबत काम करणार नाहीत, असे संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. रणवीर सिंहने फरहान अख्तरचा आगामी सिनेमा 'डॉन 3' सिनेमातून ऐनवेळेस माघार घेतल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. या सिनेमाची निर्मिती मागील तीन वर्षे सुरू होती. अख्तर आणि त्याचा पार्टनर रितेश सिधवानीने रणवीर सिंहविरोधात 'इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन' (IFTDA) कडे तक्रार नोंदवली होती, ज्यांनी पुढील कारवाईसाठी हे प्रकरण FWICE कडे सोपवले होते. 'डॉन 3' चे शुटिंग अद्याप सुरू झाले नव्हते. प्री-प्रोडक्शन (सिनेमाची पूर्वतयारी) टप्प्यात आधीच 45 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला आहे, असा निर्मात्यांचा दावा आहे.
FWICEची भूमिका काय?
FWICE चे मानद सरचिटणीस अशोक दुबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "आम्ही रणवीर सिंहसोबत काम करणार नाही, मग तो कॅमेरामन असो, स्पॉट बॉय असो, लाइटमन असो किंवा आमच्या बाजूचा अन्य कोणीही असो. हा वाद सुटेपर्यंत हे असहकार आंदोलन सुरूच राहील. एखादी व्यक्ती आपल्यासोबत काम करणारे सदस्य, तंत्रज्ञ आणि सिनेमा पाहणाऱ्या प्रेक्षकांमुळेच कलाकार बनते. तुम्ही तो सिनेमा असाच अर्धवट सोडू शकत नाही, ज्यावर अनेक लोकांनी तीन वर्षे मेहनत घेतली आहे. आम्ही तुम्हाला एक पत्र लिहिले होते, पण त्यावर काहीही उत्तर आले नाही, त्यामुळे FWICE चा कोणताही सदस्य तुमच्यासोबत काम करणार नाही."
(नक्की वाचा : Ranveer Singh: रणवीर सिंहवर बंदी! 'डॉन 3' मधून माघार घेणं पडलं महागात; पाहा अभिनेता नक्की काय म्हणाला)
रणवीर सिंहची प्रतिक्रिया | Ranveer Singh Banned News
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने आपल्या अधिकृत प्रवक्त्याद्वारे प्रतिक्रिया दिली आहे, आपण सिनेसृष्टी आणि 'डॉन' सिनेमा शृंखलेशी (फ्रेंचायझी) जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीचा नितांत आदर करतो, असे त्याने म्हटले आहे.
प्रवक्त्याने जारी करण्यात आलेल्या या निवेदनात असे म्हणण्यात आलंय की,"डॉन 3 सिनेमाबाबत नुकत्याच झालेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी (रणवीर सिंह) जाणूनबुजून मौन बाळगणे पसंत केले. व्यावसायिक चर्चा आणि वैयक्तिक संबंध हे प्रतिष्ठा, प्रगल्भता तसेच परस्पर आदराने हाताळणेच सर्वात योग्य असते, असे त्यांचे मानणे आहे. काळासोबत अनेक प्रकारच्या गोष्टी आणि तर्क-वितर्क समोर आले आहेत, पण रणवीरने कधीही जाहीरपणे यावर प्रतिक्रिया देणे किंवा अफवांना खतपाणी घालणे गरजेचे समजले नाही. त्यांचे पूर्ण लक्ष केवळ आपल्या कामावर आणि आगामी प्रोजेक्ट्सवर केंद्रित आहे."
प्रवक्त्याने पुढे सांगितले की, "ते या फ्रेंचायझीशी जोडलेल्या सर्व लोकांबद्दल मनापासून आदर आणि सदिच्छा बाळगतात तसेच या फ्रेंचायझीला भविष्यातही यश मिळत राहो, अशी प्रामाणिक इच्छा व्यक्त करतात. अशा प्रसंगात संयम आणि सभ्यतेचा मार्ग निवडणे हा नेहमीच त्यांचा जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय राहिला आहे आणि भविष्यातही ते याच भूमिकेवर ठाम राहतील."
FWICE बद्दल माहिती
'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज' (FWICE) ही भारतातील सिनेमा आणि टेलिव्हिजन कामगारांची मुख्य व्यापारी संघटना (ट्रेड युनियन) आणि सर्वोच्च संस्था आहे. संस्थेच्या वेबसाइटवरील माहितीनुसार संघटनेची स्थापना वर्ष 1956मध्ये झाली होती. आपल्या सदस्यांच्या हितसंबंधांची जपणूक करण्यासोबतच, ही संस्था कलाकार, तंत्रज्ञ आणि प्रोडक्शन स्टुडिओ यांच्यात उद्भवणारे वाद मिटवण्यासाठी मध्यस्थ म्हणून काम करते.
(Content Source PTI)