Ranveer Singh Don 3 controversy: बॉलीवूडचा 'धुरंधर' अभिनेता रणवीर सिंह आणि दिग्दर्शक फरहान अख्तर यांच्यातील वाद आता एका टोकाला पोहोचला आहे. 'डॉन 3' या बहुप्रतिक्षित चित्रपटातून रणवीरने अचानक घेतलेली माघार आता त्याच्या अंगाशी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चित्रपटसृष्टीतील महत्त्वाची संघटना असलेल्या 'एफडब्ल्यूआयसीई' (FWICE) ने रणवीरवर असहकाराचे अस्त्र उगारलं आहे. त्यानंतर आता खुद्द रणवीरने या विषयावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय आहे संपूर्ण वाद?
हा वाद 'डॉन 3' या चित्रपटाशी संबंधित आहे. दिग्दर्शक फरहान अख्तरने 11 एप्रिल रोजी फेडरेशनकडे रणवीर सिंगविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्यासाठी अवघे 3 आठवडे उरले असताना रणवीरने या प्रोजेक्टमधून माघार घेतली.
यामुळे केवळ निर्मात्यांचेच नुकसान झाले नाही, तर या चित्रपटावर अवलंबून असलेल्या हजारो कामगारांच्या रोजगाराचा प्रश्नही निर्माण झाला. फेडरेशनने रणवीरला आपली बाजू मांडण्यासाठी अनेकवेळा बोलावले, मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही, असा आरोप करण्यात आला आहे.
( नक्की वाचा : Varun Dhawan: 27 कोटींचा तोटा, तरीही वरुण धवननं एकदाही विचारलं नाही, निर्मात्यानं सांगितली मनातील सल )
रणवीरची भूमिका काय?
फेडरेशनने बंदी घातल्यानंतर रणवीर सिंहच्या प्रवक्त्याने एक अधिकृत पत्रक प्रसिद्ध करून आपली बाजू स्पष्ट केली आहे. रणवीरने म्हटले आहे की, तो चित्रपटसृष्टी आणि 'डॉन' फ्रँचायझीशी संबंधित सर्व लोकांचा मनापासून आदर करतो. या संपूर्ण वादावर त्याने जाणीवपूर्वक शांत राहणे पसंत केले आहे, कारण व्यावसायिक चर्चा आणि वैयक्तिक संबंध हे अत्यंत परिपक्वतेने आणि आदराने हाताळले जावेत, असे त्याचे मत आहे. लोकांमध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात असले, तरी रणवीरला त्यावर जाहीरपणे बोलणे आवश्यक वाटले नाही.
फेडरेशनचा कठोर निर्णय
'एफडब्ल्यूआयसीई' (FWICE) ने या प्रकरणाची गंभीर दखल घेत रणवीर सिंगवर असहकाराचा आदेश (Non-cooperation directive) लागू केला आहे. फेडरेशनचे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी स्पष्ट केले की, कोणताही सुपरस्टार उद्योगाच्या नियमांच्या वर नसतो. जोपर्यंत हा वाद सुटत नाही, तोपर्यंत संघटनेचा कोणताही सदस्य रणवीरसोबत काम करणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. हा केवळ अभिनेता आणि निर्मात्याचा वाद नसून, रोजंदारीवर काम करणाऱ्या हजारो कामगारांच्या हिताचा प्रश्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
( नक्की वाचा : नागराज, ते चाचा चौधरी... मुलांच्या जीव की प्राण असलेले 'हे' हिरो आता कुठं आहेत? वाचा हुरहुर लावणारी हळवी गोष्ट )
भविष्यातील कामांवर परिणाम होणार?
रणवीर सिंहच्या टीमने फेडरेशनच्या अधिकारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, हा वाद खासगी असल्याचे म्हटले आहे. मात्र, फेडरेशनच्या या निर्णयामुळे रणवीरच्या आगामी चित्रपटांच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रणवीरने सध्या आपल्या कामावर आणि भविष्यातील प्रोजेक्ट्सवर लक्ष केंद्रित केले असून, त्याने 'डॉन' फ्रँचायझीला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. आता हा वाद सामोपचाराने मिटतो की आणखी वाढतो, याकडे संपूर्ण चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world