- रेमो डिसुझा आणि त्याची पत्नी लिझेलने धर्मपरिवर्तनावर उघडपणे भाष्य केले
- रेमोने वयाच्या 15व्या वर्षी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि त्यानंतर कुटुंबीयांची प्रतिक्रिया सांगितली
- रेमोच्या वडिलांनी त्याला धर्म स्वीकारासाठी एक अट घातली होती
Bollywood News: बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसुझा आणि त्याची पत्नी लिझेलने नुकतेच श्रद्धा, अध्यात्म आणि धर्मपरिवर्तनाबाबत उघडपणे भाष्य केले आहे. रेमोने सांगितले की, त्यांच्या जीवनात श्रद्धा आता कशा पद्धतीने कोणत्याही एका धर्माच्या चौकटीत मर्यादित राहिलेल्या नाहीत. 'करली टेल्स'शी बातचित करताना त्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा निर्णय कसा घेतला आणि त्यानंतर कुटुंबीयांची प्रतिक्रिया कशी होती, याबाबत चर्चा केली. रेमो डिसुझाचा जन्म 'रमेश गोपी नायर' म्हणून झाला होता, पण वयाच्या 15 व्या वर्षी त्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारला.
धर्मपरिवर्तनावर रेमो डिसुझाच्या पालकांची प्रतिक्रिया
धर्मपरिवर्तन करण्याच्या निर्णयावर आईवडिलांची प्रतिक्रिया कशी होती, याबाबतही रेमोने माहिती दिली. आपल्या वडिलांसोबतचा एक खास किस्सा शेअर करताना रेमोने म्हटलं की, एकेदिवशी मी वडिलांकडे जाऊन सांगितले की मी चर्चसाठी खूप काम करतो. मला त्यांच्याशी जोडलं जायचंय असंही मला वाटतंय. त्यावर वडिलांनी ठीक आहे म्हटलं आणि माझे नाव बदलू नकोस, अशीही अट घातली. म्हणूनच माझे नाव रेमो गोपी डिसुझा असे आहे.
(नक्की वाचा: Annu Kapoor: 'ओम पुरींनी माझ्या बहिणीचे आयुष्य उद्ध्वस्त केले'; अन्नू कपूर यांनी सांगितले सख्ख्या बहिणीचे दुःख)
"माझ्या घरात शिवलिंग आहे"
रेमोची पत्नी लिझेलने सांगितलं की, पालकांच्या निधनानंतर अचानक तिचा ओढा हिंदू धर्माकडे वाढला. याबाबत तिने म्हटलं की,"गेल्या 4-5 वर्षांत कदाचित आई-वडिलांना गमावल्यामुळे मी अचानक हिंदू धर्माकडे ओढले जाऊ लागले. जरी मी कॅथोलिक असले तरी मी सर्व पूजा-पठण करते आणि मला ते करायला आवडते. आमच्या घरामध्ये भगवान शंकराची मोठी मूर्ती आणि एक छोटं शिवलिंग आहे. तसेच येशू ख्रिस्तासोबतच भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीच्या मूर्तीही तिथे असून त्यांचीही पूजा केली जाते".
रेमो बॉलिवूडमधील एक यशस्वी आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे. त्याने 'बदतमीज दिल', 'डिस्को दिवाने', 'बलम पिचकारी', 'दीवानी मस्तानी', 'पिंगा' आणि 'घर मोरे परदेसिया' यासारख्या अनेक हिट गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे.