बॉक्स ऑफिसवर सध्या 'बॉर्डर 2' या चित्रपटाने चांगलीच हवा केली आहे. सनी देओलच्या या चित्रपटाने देशांतर्गत बाजारपेठेत जोरदार ओपनिंग केली आहे. मात्र जागतिक पातळीवर मात्र आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' (Dhurandhar) चित्रपटाचा पहिल्या दिवसाचा विक्रम मोडण्यात हा चित्रपट थोडक्यात हुकला आहे.
सनी देओलच्या 'बॉर्डर 2' ने पहिल्या दिवशी भारतात 30 कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. मात्र, ओव्हरसीजमध्ये पिछाडीवर पडल्याने जागतिक स्तरावर 'धुरंधर'च्या 41.5 कोटींच्या विक्रमाला हा चित्रपट ओलांडू शकला नाही. 'बॉर्डर 2' ने एकूण 41 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
'बॉर्डर 2' विरुद्ध 'धुरंधर'
भारतातील बॉक्स ऑफिसवर सनी देओलच्या लोकप्रियतेचा फायदा 'बॉर्डर 2' ला मिळाला आहे. या चित्रपटाने 30 कोटी नेट कमाई करत 'धुरंधर'ला (27 कोटी) मागे टाकले आहे. विशेषतः उत्तर भारतात आणि सिंगल स्क्रीनवर या चित्रपटाचा मोठा प्रभाव दिसून आला. 'धुरंधर'ने परदेशात 7.70 कोटींची कमाई केली होती, तर 'बॉर्डर 2' ला फक्त 5 कोटींचा आकडा गाठता आला. यामुळे जागतिक पातळीवर 'बॉर्डर 2' चा एकूण आकडा 41 कोटींवर स्थिरावला. आता 26 जानेवारीचा मोठा विकेंड समोर असल्याने, 'बॉर्डर 2' येत्या काही दिवसांत 'धुरंधर'ला टक्कर देण्यात यशस्वी होतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
सनी देओलच्या 'बॉर्डर 2' मध्ये ॲक्शन आणि इमोशन्सचा जबरदस्त मिश्रण पाहायला मिळत आहे. वरुण धवन, अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांझ यांच्या दमदार अभिनयाने नटलेला हा चित्रपट देशभक्तीचा नवा अनुभव देणारा आहे.
बॉर्डर 2' ची गोष्ट
यावेळची कथा 1971 च्या युद्धावर आधारित आहे, ज्यामध्ये 1060 ते 1970 या दशकातील कालखंड उभा करण्यात आला आहे. चित्रपटात भारतीय भूदल, नौदल आणि वायुदल या तिन्ही सेनांच्या पराक्रमाची गाथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटाचा पहिला भाग सैनिकांच्या कुटुंबावर आणि त्यांच्या भावनांवर लक्ष केंद्रित करतो, तर मध्यंतरानंतर चित्रपट पूर्णपणे रणभूमीवर जातो. चित्रपटाचा शेवट सनी देओल आणि वरुण धवन यांच्यातील जबरदस्त जुगलबंदीने होतो, जी प्रेक्षकांसाठी 'पैसा वसूल' अनुभव आहे.
दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजू
दिग्दर्शक अनुराग सिंग यांनी युद्धपटाचे गांभीर्य राखत त्यात मानवी भावनांची उत्तम गुंफण केली आहे. 'बॉर्डर' म्हटलं की फक्त गोळीबार आणि रणगाडे असं न ठेवता, सीमेवर लढणाऱ्या सैनिकाच्या मागे असलेल्या त्याच्या कुटुंबाची कहाणी त्यांनी प्रभावीपणे मांडली आहे. चित्रपटाचे व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX) आणि सिनेमॅटोग्राफी हॉलिवूड दर्जाची वाटते.
कलाकारांचा अभिनय
बॉर्डर 2 हा चित्रपट पूर्णपणे सनी देओलचा आहे. वयाच्या या टप्प्यावरही त्याचा तोच जोश आणि 'धाकड' आवाज अंगावर शहारे आणतो. सनी देओल संपूर्ण चित्रपट आपल्या खांद्यावर घेऊन जातो. हे या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य आहे.
चित्रपटाच्या प्रोमोवरून वरुणच्या अभिनयावर टीका करणाऱ्यांना त्याने आपल्या कामाने सडेतोड उत्तर दिले आहे. त्याने चित्रपटात दमदार अभिनय केला आहे. तर दिलजीत दोसांझने आपल्या सहज अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. हरियाणवी अंदाजात मेधा राणाने केलेली भूमिका लक्षवेधी ठरली आहे.