Marathi Actor Sagar Karande Fraud: सध्या सायबर क्राईमच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून, घरबसल्या पैसे कमावण्याच्या योजना सांगून अनेकांची लाखोंची ऑनलाईन फसवणूक केल्याच्या बातम्या सर्रास ऐकायला मिळतात. या जाळ्यात आता मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता, चला हवा येऊ द्या फेम सागर कारंडेही अडकला आहे. अभिनेता सागर कारंडेची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अभिनेता सागर कारंडेची फसवणूक..
प्रसिद्ध हास्यकलाकार, लेखक आणि अभिनेता सागर कारंडे याची तब्बल 61 लाखांची फसवणूक झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. इन्स्टारग्रामवरील पोस्टला लाईक करा आणि 150 रुपये मिळवा.. असे आमिष दाखवून सागर कारंडेंकडून 61 लाख रुपये उकळण्यात आलेत. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात अभिनेता सागर कारंडेला त्याच्या वॉट्सअप क्रमांकावर एका महिलेचा मेसेज आला. त्या महिलेने सागर कारंडे याला टेलिग्राम, इंन्स्टाग्रामवरील काही लिंक पाठवल्या तसेच या लिंक लाईक केल्यास प्रत्येक लाईकचे 150 रुपये मिळतील, असं सांगितले. अशाप्रकारे घरबसल्या तुम्ही 60,000 रुपये पर्यंत पैसे कमाऊ शकता, असेही त्याला सांगण्यात आले. महिलेच्या या बोलण्यात अभिनेता सागर कारंडे फसला आणि त्याने त्यास होकार दिला.
(नक्की वाचा- Waqf Bill: लोकसभेनंतर राज्यसभेतही वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर; बाजूने 128, विरोधात 95 मते)
सायबर चोरट्यांनी कसे लुटले 60 लाख रुपये?
सुरुवातीला सागर कारंडेला सायबर चोरट्यांकडून 10 वेळा 11 हजार रुपये मिळाले त्यामुळे त्याचा विश्वास बसला. त्यानंतर अधिक पैसे कमावण्यासाठी काही रक्कम गुंतवावी लागेल असे त्याला सांगण्यात आले. त्यानुसार सागर कारंडेने 27 लाख रुपये गुंतवले. मात्र ते गुंतवलेले पैसे पूर्ण टास्क झाल्यानंतरच काढता येतील असे त्याला सांगण्यात आले.
त्यानंतर त्याला आणखी पैसे गुंतवण्यास भाग पाडून 19 लाख रुपये आणि त्यावर करही भरण्यास सांगितला. मात्र इतके पैसे दिल्यानंतरही परतावा मिळत नसल्याने तसेच पैसे काढताही येत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे अभिनेत्याच्या लक्षात आले त्यानंतर त्याने पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.
(नक्की वाचा- Pandharpur News : शहाजीबापू पाटलांनी भर सभेत थोबाडीत मारून घेतली, नेमकं काय घडलं?)