- देऊळबंद 2 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करून मराठी चित्रपटसृष्टीत नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे
- प्रवीण तरडे यांनी चित्रपटातून मिळालेलं संपूर्ण उत्पन्न शेतकऱ्यांच्या मुलांना देण्याचा निर्णय घेतला आहे
- देऊळबंद 2 चित्रपटामध्ये सामाजिक आशय आणि भक्तीचा उत्कृष्ट संगम असून प्रेक्षकांच्या पसंतीस पात्र ठरला आहे
शुभम बायस्कार
देऊळबंद 2 चित्रपटाची सध्या बॉक्स ऑफीसवर धूम आहे. या चित्रपटामुळे मराठी चित्रपट सृष्टीत बॅक टू बॅक दोन चित्रपट सुपर हीट ठरले आहेत. रितेश देशमुखचा राजे शिवछत्रपतीनंतर देऊळबंदने प्रेक्षकांना चित्रपट गृहाकडे अक्षरश: ओढून नेले आहे. देऊळबंद 2 मधून सामाजिक आशय आणि भक्ती याचा चांगला मेळ घालण्यात आला आहे. त्यामुळे हा चित्रपट रसिकांच्या पसंतीला उतरत आहे. चित्रपटाची पकड पहिल्या क्षणापासून शेवटच्या क्षणापर्यंत सुटू देत नाही हे त्याचे वैशिष्ट्य मानावे लागेल. त्यामुळे या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई केली आहे. त्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी जो काही निर्णय घेतला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या लेकरांना मात्र अच्छे दिन येणार आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत प्रेरणादायी आणि मनाला स्पर्श करणारी अशीच ही बातमी आहे. लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी अमरावतीत एक ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. आपल्या सुपरहिट 'देऊळबंद' 2 चित्रपटातून मिळणारे संपूर्ण उत्पन्न ते शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी दान करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना मोठा आधार मिळणार आहे. या चित्रपटाचा भागा ही शेतकरीच आहे. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
लोकांनी या चित्रपटाला जे भरभरून प्रेम दिलं आहे, ते लोकांचं आहे. ते आता लोकांसाठीच वापरलं जाईल. आम्ही केवळ मनोरंजनासाठी नाही, तर सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी चित्रपट करतो असं तरडे म्हणाले. प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो, त्यामुळे हे यश आता शेतकऱ्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी समर्पित करत असल्याचे तरडे यांनी आवर्जून सांगितले. कलेच्या माध्यमातून समाजकारणाचा वसा घेतलेला एक कलाकार म्हणून तरडेंनी पुन्हा एकदा आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या निर्णयाचे सगळ्यांनीच स्वागत केले आहे.
देऊळबंद 2 या चित्रपटाने आतापर्यंत 75 कोटींचा टप्पा गाठला आहे. 'देऊळ बंद 2' सिनेमानं पहिल्या आठवड्यात 30.2 कोटी रुपयांची कमाई केल्याचे समोर आले आहे. तर दुसऱ्या आठवड्यात याच सिनेमाने 22.4 कोटींचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे नवं रेकॉर्ड हा चित्रपट प्रस्थापित करतो का हे पहावं लागणार आहे. शेतकरी आणि त्याची व्यथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे.जबरदस्त अभिनय आणि तेवढीच जबरदस्त मांडणी या मुळे हा चित्रपट सर्वांच्याच पसंतीला उतरत आहे. त्यात आता तरडे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आणखी लोक हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपट गृहात जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.