- धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झाले.
- विलेपार्लेतील स्मशानभूमीत धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले.
- सनी देओल आणि हेमा मालिनी यांनी वेगवेगळ्या प्रार्थनासभेचे आयोजन केले होते.
Dharmendra Prayer Meet: बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद यांचे 24 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झाले. श्वसनाशी संबंधित समस्यांमुळे ऑक्टोबर 2025 रोजी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. काही दिवसांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आणि पुढील उपचार घरातच करण्याचा निर्णय देओल कुटुंबीयांनी घेतला. यादरम्यान 24 नोव्हेंबर 2025 रोजी धर्मेंद्र यांनी जगाचा निरोप घेतला. विलेपार्लेतील स्मशानभूमीत धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर सनी-बॉबीने आई प्रकाश कौर यांच्या उपस्थितीत 27 नोव्हेंबर रोजी मुंबईतील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये धर्मेंद्र यांच्यासाठी प्रार्थना सभा आयोजित केली. त्याच दिवशी हेमा मालिनींनी मुंबईतील निवासस्थानी भजनाचे आयोजन केले होते. सनी देओल यांनी आयोजित केलेल्या प्रार्थना सभेत हेमा मालिनी तसेच त्यांच्या मुली दिसल्या नाहीत. त्यानंतर 11 डिसेंबर रोजी नवी दिल्लीमध्ये हेमा मालिनींनी आणखी एका प्रार्थनासभेचे आयोजन केले होते, तेथे सनी-बॉबी दिसले नव्हते.
वेगवेगळ्या प्रार्थनासभा आयोजनाबाबत हेमा मालिनींनी काय म्हटलं?
यानंतर धर्मेंद्र यांच्या दोन कुटुंबांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. पण अलीकडेच हेमा मालिनी यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत याबाबतचं आपले म्हणणं मांडलं. हेमा मालिनी म्हणाल्या की, "हा आमच्या घरातील विषय आहे. आम्ही एकमेकांशी बोललोय. मी माझ्या घरी एक प्रार्थनासभा ठेवली कारण माझा मित्रपरिवार वेगळा आहे. त्यानंतर दिल्लीमध्ये आणखी एक सभा ठेवली कारण मी राजकारणात आहे आणि त्या क्षेत्रातील मित्रांसाठी वेगळी प्रार्थना सभा ठेवणे आवश्यक होते. मथुरा हा माझा मतदारसंघ आहे आणि तेथील स्थानिक धर्मेंद्र यांच्यासाठी अक्षरशः वेड होते. म्हणूनच तिथेही एक प्रार्थनासभा आयोजित केली. मी जे केलं त्याबाबत समाधानी आहे."
हेमा मालिनी म्हणाल्या की, मी, ईशा, अहाना, सनी, बॉबी सर्वजण एकत्र होतो
याच मुलाखतीत हेमा मालिनी यांनी सांगितले की, धरमजी ठीक असते तर त्यांचा 90वा वाढदिवस कुटुंबीयांसोबत साजरा केला असता. पुढे त्या असंही म्हणाल्या की, "हा खूप मोठा धक्का होता. तो काळ खूप वाईट होता कारण ते आजारी असताना आम्ही जवळपास महिनाभर काळजीत होतो. हॉस्पिटलमध्ये जे काही घडत होतं, त्याला सामोरे जाण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. मी, ईशा, अहाना, सनी, बॉबी आम्ही सर्वजण एकत्र होतो. यापूर्वीही असं अनेकदा घडलंय की ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आणि ठीक होऊन घरी परतले. यावेळीही तसेच होईल, असे आम्हाला वाटले होते."
(नक्की वाचा: Dharmendra News: धर्मेंद्र-हेमा मालिनींच्या नातवाचा फोटो पाहिला का? चेहरा पाहून चाहत्यांना हीमॅनची आली आठवण)
धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा, पाहा व्हिडीओ
(नक्की वाचा: Dharmendra News: धर्मेंद्र हेमा मालिनींपेक्षा वयाने किती मोठे होते? अंतर नाही प्रेम जिंकलं...)
हेमा मालिनी पुन्हा कामावर परतणार
हेमा मालिनींनी सांगितलं की, "ते (धर्मेंद्र) आमच्याशी व्यवस्थित संवाद साधत होते. 16 ऑक्टोबरला माझ्या वाढदिवशी त्यांनी मला शुभेच्छाही दिल्या होत्या. त्यांचा वाढदिवस 8 डिसेंबरला येणार होता, तेव्हा ते 90 वर्षांचे होणार होते आणि आम्ही हा वाढदिवस आनंदाने साजरा करण्याची तयारी करत होतो. तयारी सुरू होती आणि अचानक ते आमच्यातून निघून गेले. त्यांना जाताना पाहणे फार कठीण होते. आयुष्यात असा क्षण कुणाच्याही वाट्याला येऊ नये. आता मी पुन्हा माझ्या कामाला सुरुवात करतेय. मी मथुरेला जातेय. माझे कार्यक्रम पुन्हा सुरू करणार आहे आणि जे काम आहे ते करत राहणार, कारण यातूनच धरमजींना आनंद मिळेल."