Entertainment News: हॉरर आणि सायकॉलॉजिकल थ्रिलरच्या जगात 'द सायलन्स ऑफ द लॅम्ब्स' (The Silence of the Lambs) हे एक असे नाव आहे, जे आजही प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणते. 1991 मध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा केवळ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला नाही, तर ऑस्कर पुरस्कारांमध्ये इतिहास रचत पाच प्रमुख श्रेणींमध्ये विजय मिळवला. या सिनेमाच्या प्रदर्शनाला आता 35 वर्षे पूर्ण झाली आहेत. सिनेमाचे दिग्दर्शन जोनाथन डेमे यांनी केले होते. या सिनेमाची कथा एफबीआय ट्रेनी (Trainee) क्लॅरिस स्टार्लिंग हिच्याभोवती फिरते, जी एका सीरिअल किलरला पकडण्यासाठी शिक्षा भोगत असलेल्या एका मनोरुग्ण डॉक्टरची म्हणजेच हॅनिबल लेक्टरची मदत घेते
द सायलेन्स ऑफ द लॅम्ब्समधील अँथनी हॉपकिन्स
सिनेमातील स्टारकास्ट
‘द सायलन्स ऑफ द लॅम्ब्स' मध्ये जोडी फोस्टर हिने क्लॅरिस स्टार्लिंगची तर अँथनी हॉपकिन्स यांनी डॉक्टर हॅनिबल लेक्टरची भूमिका साकारली. हॉपकिन्स यांची ही व्यक्तिरेखा इतकी अजरामर झाली की, आजही तिची गणना सिनेमातील सर्वात भयानक खलनायकांमध्ये केली जाते. इतर प्रमुख कलाकारांमध्ये स्कॉट ग्लेन, टेड लेव्हाइन आणि अँथनी हील्ड यांचा समावेश होता. जोडी फोस्टरच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले, ज्यात तिने एका कणखर तरीही संवेदनशील महिला एजंटच्या भावना अतिशय प्रभावीपणे मांडल्या. अँथनी हॉपकिन्स यांनी संपूर्ण चित्रपटात केवळ 16 मिनिटांच्या स्क्रीन टाइममध्ये असा प्रभाव पाडला की, त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर मिळाला.
सिनेमाचं माफक बजेट, प्रचंड कमाई
या सिनेमाचे बजेट केवळ 19 दशलक्ष डॉलर्स होते. पण सिनेमाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 272.7 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली, जी त्या काळातील एक मोठी कमाई मानली जाते. एकट्या अमेरिकेत या सिनेमाने 130 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त कमाई केली. सिनेमाची कथा, उत्कृष्ट दिग्दर्शन आणि अभिनय यामुळे हे यश मिळाले. 1991 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत हा सिनेमा पाचव्या क्रमांकावर होता.
ऑस्कर पुरस्कारांमध्ये 'द सायलन्स ऑफ द लॅम्ब्स'ने इतिहास रचला. 64व्या अकादमी पुरस्कारांमध्ये हा सिनेमा ‘बिग फाइव्ह' (Big Five) श्रेणी जिंकणारा तिसरा आणि शेवटचा सिनेमा ठरला. यामध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (जोनाथन डेम्मे), सर्वोत्कृष्ट अभिनेता (अँथनी हॉपकिन्स), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (जोडी फोस्टर) आणि सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा (टेड टॅली) यांचा समावेश होता. सर्वोत्कृष्ट सिनेमा जिंकणारा हा पहिला हॉरर सिनेमा होता.
1. जेव्हा अँथनी हॉपकिन्स यांना सिनेमाची स्क्रिप्ट मिळाली, तेव्हा टायटल वाचून त्यांनी विचारले होते की, "ही मुलांची गोष्ट आहे का?" पण स्क्रिप्ट वाचताच त्यांना जाणीव झाली की ही व्यक्तिरेखा किती गडद (Dark) आणि तीव्र आहे.
2. इतकेच नाही तर जोडी फोस्टर आणि अँथनी हॉपकिन्स संपूर्ण शुटिंगदरम्यान एकमेकांशी वैयक्तिकरित्या बोलले नाहीत. जोडीने सांगितले होते की, अँथनी हॉपकिन्स तिला इतके भयानक वाटायचे की ती मुद्दाम त्यांच्यापासून दूर राहायची आणि तिची ही भीती तिच्या अभिनयात अगदी नैसर्गिक वाटली.
सिनेमाचा हिंदी रिमेक
वर्ष 1991 च्या या सिनेमाचा एक अनधिकृत हिंदी रिमेक देखील बनला आहे. ‘संघर्ष' या नावाने हा सिनेमा तयार करण्यात आला होता, ज्याचे दिग्दर्शन तनुजा चंद्रा यांनी केले होते. या सिनेमाची कथा महेश भट्ट यांनी लिहिली होती. यात अक्षय कुमार, प्रीती झिंटा आणि आशुतोष राणा मुख्य भूमिकेत होते.
भारतात ओटीटीवर कुठे पाहाल सिनेमा?
भारतात हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. तुम्ही हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर (Amazon Prime Video) पाहू शकता. हिंदी भाषेत डब केलेला सिनेमा देखील उपलब्ध आहे, तरीही मूळ इंग्रजी आवृत्ती अधिक पसंत केली जाते. तुम्हाला हॉरर सिनेमा पाहायला आवडत असेल तर हा सिनेमा नक्कीच पाहा.