Hindustani Bhau Slams Jaya Bachchan: आपल्या स्पष्ट आणि वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारा हिंदुस्तानी भाऊ ऊर्फ विकास पाठक याने आता जया बच्चन यांच्यावर सडकून टीका केली आहे. जया बच्चन यांनी एका मुलाखतीदरम्यान पापाराझींच्या कपड्यांवर आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यावर संताप व्यक्त करताना हिंदुस्तानी भाऊने या फोटोग्राफर्सना त्यांच्या 'स्वाभिमानाची' जाणीव करून दिली.
नेमका वाद काय?
जया बच्चन यांनी एका शोमध्ये पापाराझींबद्दल बोलताना म्हटले होते की, "हे लोक कोण आहेत? घाणेरड्या आणि घट्ट पॅन्ट घालून, हातात मोबाईल घेऊन बसलेले असतात. मोबाईल आहे म्हणून कोणाचेही फोटो काढू शकतात आणि काहीही बोलू शकतात असे त्यांना वाटते. तुम्ही माझे घर फोडून उंदरासारखे आत शिरता." त्यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त होत होता.
हिंदुस्तानी भाऊचा सडेतोड प्रहार
एका कार्यक्रमात बोलताना विकास पाठक यांनी थेट जया बच्चन यांचे नाव घेत टीका केली. ते म्हणाले, "काय नाव त्यांचं? अमिताभ बच्चन यांच्या पत्नी, जया बच्चन... त्या स्वतः 150 रुपयांची साडी नेसतात आणि या गरिबांना (पापाराझी) बोलतात. त्यांना त्यांच्या औकातीची जाणीव तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही त्यांना दाखवणे बंद कराल. तुमच्यामुळेच हे लोक जगाला दिसतात, अन्यथा त्यांना कोणी ओळखतही नसते."
पापाराझींना कळकळीची विनंती
विकास पाठक पुढे म्हणाला, "मी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करतो, जिथे तुम्हाला सन्मान मिळत नाही तिथे जाऊ नका. आम्ही जे काही बनलो आहोत, ते तुमच्यामुळेच आहोत. जर आम्हीच तुमचा सन्मान केला नाही, तर तुम्हाला विचार करणे गरजेचे आहे. त्या वरच्या मालकाला सांगा की जिथे आमची इज्जत होत नाही तिथे आम्हाला पाठवू नका. अशा लोकांच्या मागे का धावता ज्यांना तुमची किंमत नाही?"
हिंदुस्तानी भाऊने म्हटलं की, कलाकार कितीही मोठे असले तरी त्यांना प्रसिद्धी मिळवून देण्यात या फोटोग्राफर्सचा मोठा वाटा असतो. त्यामुळे आपल्या कामाचा आदर न करणाऱ्या सेलिब्रिटींना कव्हरेज देणे बंद करा, असा सल्ला त्यांनी पापाराझींना दिला आहे.