Jhimma 3 Move: महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात पोहोलेला, मैत्रीचा जल्लोष रंगवणारा आणि प्रत्येकाला 'आपलीच गोष्ट' वाटणारा ‘झिम्मा'चा प्रवास आता नव्या वळणावर येतोय… आणि या वेळी गोंधळ जरा जास्तच दिसतोय! मैत्री, नात्यांचा भावनिक स्पर्श आणि धमाल ट्रिप यांचं भन्नाट मिश्रण सादर करणाऱ्या 'झिम्मा' आणि 'झिम्मा 2'ने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळवलं.
थिएटरमध्ये 'हाऊसफुल्ल'चे बोर्ड, सोशल मीडियावर चर्चा आणि बुकमायशोवर ट्रेंडिंग या सगळ्यामुळे 'झिम्मा' हा फक्त सिनेमापुरता मर्यादित न राहता एक अविस्मरणीय प्रवासाचा अनुभव बनला आणि आता… त्या अनुभवाचा तिसरा भाग अधिकृतपणे समोर आला आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्या वाढदिवसानिमित्त 'झिम्मा 3'चं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. त्याने सोशल मीडियावर अक्षरशः खळबळ उडवली आहे.
झिम्मा 3 सिनेमा कधी होणार रिलीज?
पुढील वर्षी म्हणजेच 1 जानेवारी 2027 मध्ये 'झिम्मा 3' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच ‘क्रांतीज्योती विद्यालय - मराठी माध्यम'च्या जल्लोषमय सोहळ्यात या सिनेमाची घोषणा झाली होती आणि आता पोस्टरमुळे उत्सुकता आणखीच वाढली आहे.
पोस्टर पाहिल्यावर एक गोष्ट लगेच लक्षात येते, यावेळी काहीतरी वेगळं घडणार आहे. समुद्रकिनाऱ्यावर उभा असलेला सिद्धार्थ चांदेकर, त्याच्या चेहऱ्यावरचा गोंधळ, आजूबाजूला भरपूर बॅग्स, सुटकेसेस, क्रिकेट बॅट आणि सूर्यफूल… त्यामुळे ही सहल आहे की काहीतरी अनपेक्षित ट्विस्ट? आणि यावेळी ‘तिसराच आहे!' या ओळीत नेमकं काय लपलंय? असे प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडले आहेत.
सिनेमाच्या तिसऱ्या भागात नेमकं काय पाहायला मिळणार?
पहिल्या दोन भागांमध्ये मैत्रिणींचा ग्रुप प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. आता तिसऱ्या भागात त्या पुन्हा एकत्र येणार का, की या वेळी काही नवे चेहरे, नवी नाती या ग्रुपमध्ये सामील होणार? हे पाहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
चलचित्र मंडळी प्रस्तुत ‘झिम्मा 3'चं दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केलं असून निर्मिती क्षिती जोग यांनी केली आहे. विशेष म्हणजे क्रांतिज्योती विद्यालय सिनेमानंतर परत एकदा नव्या वर्षाची धमाकेदार सुरुवात करत चलचित्र मंडळी ‘झिम्मा 3' 1 जानेवारी 2027 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आणत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world