बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खान सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. मुंबई विमानतळाच्या प्रवेशद्वारावरील तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यामुळे इंटरनेटवर समान हक्क आणि सेलिब्रिटींना मिळणाऱ्या विशेष सवलतींवरून वादंग निर्माण झाले आहे.
नेमकं प्रकरण काय?
व्हायरल व्हिडिओमध्ये करीना कपूर मुंबई विमानतळाच्या सिक्युरिटी चेकसाठी असलेल्या प्रवाशांच्या लांबच लांब रांगेला डावलून थेट गेटवर जाताना आणि आत प्रवेश करताना दिसत आहे. 'X' वर एका युजरने ही पोस्ट शेअर केली असून, आतापर्यंत याला 14 लाख व्ह्यूज मिळाले आहेत
नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
या पोस्टवर प्रतिक्रिया देताना अनेक युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. "करीना कोणापेक्षाही श्रेष्ठ नाही. विमानतळावरील इतर प्रवाशांनाही महत्त्वाची विमाने पकडायची असतात, मग तिलाच ही सूट का?" असा सवाल एकाने विचारला. "ऑन ड्युटी असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांनी तिला थांबवायला हवे होते. आपणच या लोकांना मोठे केले आहे," असे एका युजरने म्हटले.
करीनाच्या समर्थनातही उमटले सूर
दुसरीकडे, काही युजर्सनी करीनाचा बचाव करत या प्रक्रियेमागील तांत्रिक बाजू स्पष्ट केली आहे. अनेकांनी निदर्शनास आणून दिले की, विमानतळावर 6000 रुपयांची पेड सर्व्हिस उपलब्ध आहे, ज्याद्वारे कोणीही रांग न लावता जलद प्रवेश मिळवू शकतो. करीनानेही याच सुविधेचा वापर केला असावा, असे समर्थकांचे म्हणणे आहे.
एका युजरने म्हटले की, गर्दीच्या ठिकाणी सेलिब्रिटी रांगेत उभे राहिल्यास गोंधळ निर्माण होऊ शकतो, त्यामुळे त्यांना वेगळा मार्ग दिला जातो, असेही काही जणांनी नमूद केले.