Kaun Banega Crorepati 17 : ‘कौन बनेगा करोडपती' हा टीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. यंदाच्या १७व्या सिझनमध्येही या कार्यक्रमाने पहिल्याच एपिसोडपासून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या कार्यक्रमात आजवर अनेकांनी आपल्या ज्ञानाच्या जोरावर हॉट सीटवर येऊन लाखो रुपये जिंकले. असाच एक प्रसंग नुकत्याच एका एपिसोडमध्ये घडला. दिल्लीची 21 वर्षांची तरुणी कशिश सिंघल हिने आपल्या अभ्यासाची आणि ज्ञानाची चुणूक दाखवत 1 कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत मजल मारली, पण एका ऐतिहासिक प्रश्नाने तिचा प्रवास तिथेच थांबला.
कशिशने तिच्या जबरदस्त खेळाने सगळ्यांनाच प्रभावित केले. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देताना तिचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा होता. तिने एक-एक करत 14 प्रश्नांची अचूक उत्तरे दिली आणि ती 1 कोटी रुपयांच्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नापर्यंत पोहोचली. या टप्प्यापर्यंत पोहोचताना तिने तिच्या सर्व लाइफलाईन्सचा वापर केला होता, त्यामुळे तिच्याकडे आता मदतीसाठी कोणताही पर्याय शिल्लक नव्हता. या परिस्थितीतही तिने हार मानली नाही. 15 वा प्रश्न अमिताभ बच्चन यांनी 1 कोटी रुपयांसाठी विचारला. तो प्रश्न इतिहास आणि मसाल्यांशी संबंधित होता.
(नक्की वाचा- Top 10 movies: जुलै महिन्यातील टॉप 10 चित्रपटांची यादी आली समोर, 'सैयारा' कितव्या क्रमांकावर?)
काय होता प्रश्न?
“व्हिसिगॉथ्सचा असा कोणता राजा होता, ज्याने प्राचीन रोम शहरातून खंडणी म्हणून काळ्या मिरीची मागणी केली होती? या प्रश्नाचे योग्य उत्तर अलारिक असे होते.
(नक्की वाचा- इतक्या सोप्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही, सगळ्या लाइफलाईन संपवल्या; साडेसात लाखावर सोडले पाणी)
हा प्रश्न ऐकून कशिशला नक्की उत्तर देता आले नाही. एकीकडे 1 कोटी रुपयांचे स्वप्न आणि दुसरीकडे ५० लाख रुपयांची रक्कम गमावण्याची भीती. अशा परिस्थितीत, तिने धोका न पत्करता खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयाची खुद्द अमिताभ बच्चन यांनीही प्रशंसा केली.
कशिश 50 लाख रुपये घेऊन शोमधून बाहेर पडली. तिचे करोडपती होण्याचे स्वप्न भलेही पूर्ण झाले नाही, पण तिच्या आत्मविश्वासाने आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेने तिने अनेकांच्या मनात जागा मिळवली.