KJVMM box office collection: बॉक्स ऑफिसवर सध्या रणवीर सिंहचा सुपरहिट चित्रपट 'धुरंधर' आणि प्रभासच्या 'द राजा साब' या चित्रपटांची चर्चा सुरू आहे. या दोन बड्या चित्रपटांच्या त्सुनामीदरम्यान एक छोट्याशा मराठी चित्रपटाने गुपचूप येत सर्वांनाच हैराण केलं आहे. या चित्रपटाचं नाव आहे 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम'. या चित्रपटाने अवघ्या ११ दिवसात आपल्या बजेटपेक्षा अनेक पटीने अधिक कमाई करीत इतिहास रचला आहे. भावनिक आणि सामाजिक ड्रामा चित्रपट १ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित झाला होता. हेमंत ढोमेने या चित्रपटाचं लेखन आणि निर्मिती केली आहे.
चित्रपटाची कथा...
क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाची कहाणी एका जुन्या मराठी माध्यम शाळेसंबंधित आहे. वाढत्या इंग्रजी शाळांच्या गर्दीत मराठी माध्यमांची शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे. यासाठी माजी विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र येत ही शाळा वाचविण्यासाठी प्रयत्न करतात. या चित्रपटात जुन्या आठवणी अत्यंत भावनात्मकपणे दाखविण्यात आल्या आहेत. या चित्रपटात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, प्राजक्ता कोळी, क्षिती जोग, कादंबरी कदम आणि हरीश दुधाडे मुख्य भूमिकेत आहेत.
क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम चित्रपटाचं कलेक्शन...
ट्रेड एक्सपर्टनुसार, चित्रपटाचा बजेट केवळ २ कोटी रुपये होता. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने ६.१४ कोटी कमावले, दुसऱ्या आठवड्यात धमाल करीत आणि ५.११ कोटी जोडले. एकूण ११ दिवसात या चित्रपटाचं कलेक्शन ११.२५ कोटींपर्यंत पोहोचलं आहे. याचा अर्थ निर्मात्यांना ९.२५ कोटींचा नफा झाला आहे. जो त्यांच्या चित्रपटाच्या बजेटच्या ४६२.५ टक्के आहे. याची तुलना रणवीर सिंहच्या धुरंधर (एकूण बजेट २२५ कोटी) चित्रपटाशी केली तर ३८ दिवसात चित्रपटाने भारतात ८५७.४० कोटी कमावले. नफा २८१ टक्के आहे. प्रॉफिटबद्दल बोलायचं झालं तर 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' या चित्रपटाने मोठ्या बॉलिवूड चित्रपटाला मागे टाकलं आहे.