Mercedes Controversy: '...तोपर्यंत पाणीही पिणार नाही', मराठी अभिनेत्याचे उद्धव ठाकरेंना पत्र; मागणी काय?

Neelam Gorhe Mercedes Controversy: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या, असे धक्कादायक विधान केले. निलम गोऱ्हेंच्या या विधानानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

Actor Kiran Mane Letter To Uddhav Thackeray:  राज्याच्या राजकारणात सध्या मर्सिडीजवाद सुसाट सुरु आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या, असे धक्कादायक विधान केले. निलम गोऱ्हेंच्या या विधानानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. यावरुनच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेते किरण माने यांनी लिहलेली खरमरीत पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

किरण मानेंची पोस्ट जशीच्या तशी....

मा. उद्धवसाहेब ठाकरे, जय महाराष्ट्र. याठिकाणी हा सरासर अन्याय आहे. एक शिवसैनिक या नात्यानं या ठिकाणी तुमच्याकडे मागणी करतो की तुमच्याकडे पडून असलेल्या हज्जारो मर्सिडीजांपैकी मला ही फोटोतली मर्सिडिज पायजे म्हणजे पायजेच याठिकाणी... मला कुठलंही पद नको.
ही मर्सिडीज माझ्या सातार्‍यातल्या घरी पोहोच झाल्याशिवाय मी पाणीही पिणार नाही हे याठिकाणी मी अण्णा हजारेंची शप्पथ घेऊन सांगतो

'अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलना'त विश्वविख्यात साहित्यिक विदुषी निलमताई गोर्‍हे यांची मुलाखत झाली. आता तिथे मुलाखत झाली म्हणजे त्या याठिकाणी कुणीतरी लै दर्जेदार खतरनाक लेखिका असणार असा माझ्या मनाचा समज झाला... पण फोटो पाहुन थोडी शंका आली. मग आमच्या शेतात रोजानं काम करणार्‍या एका पुस्तकवेड्या मजुराकडं चौकशी केली. तो खुप डोके खाजवून म्हणाला म्हणाला की बहुतेक मी यांच्या मराठी भयकथा आणि स्वप्नरंजक श्टोर्‍या वाचल्यासारखं वाटतंय. असो. ज्या पत्रकारानं त्यांची मुलाखत घेतली आहे, त्या पत्रकाराला पाहून तो म्हणाला हे चष्मा,मिशीवाले महाशयही याठिकाणी 'स्पाॅन्सर्ड' बनावट साहित्यात दिग्गज आहेत. मग 'निलमजी साहित्यिक आहेत' यावर माझा विश्वास बसला. इतका बसला, इतका बसला की जेवढा विश्वास याठिकाणी लाडक्या बहिणींचा एकनाथरावांवर आहे तितका बसला.

Advertisement

नक्की वाचा - Shivjayanti 2025: 'हजारो वर्षांचा इतिहास 36 मिनिटात मांडला..' शिवसृष्टी पाहून मुख्यमंत्री भारावले!

तर मुद्दा असा की, त्या म्हणाल्या "शिवसेनेत एक पद मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंना दोन मर्सिडिज द्याव्या लागतात." उद्धवजी, मी चकित झालो ! माझ्या अंदाजाप्रमाणं विश्वविख्यात साहित्यिक निलमताईंना तुम्ही आमदारक्या, उपसभापतीपदं अमुक तमुक ढमुक अशी सहा मोठी पदं दिलेली आहेत. म्हणजे त्यांनी तुम्हाला टोटल एक डझन मर्सिडीझी दिलेल्या आहेत हे याठिकाणी सुर्यप्रकाशाइतक्या लख्खपणे सिद्ध होते !!!

त्याचप्रमाणे तुम्ही रिक्षावाल्या, पानपट्टीवाल्या, भंगारवाल्या अशा दिग्गज व्यावसायिकांना आणि याठिकाणी अनेक सटरफटर फडतुसांना नगरसेवक, सभापती, महापौर, नगराध्यक्ष, जिल्हापरिषद, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री केले आहे. याचे माझ्याकडे ट्रकभर पुरावे आहेत. (अण्णा हजारेंची शप्पथ.) या न्यायानं मोजत बसलो तर तुमच्याकडं हजारो मर्सिडिज याठिकाणी धुळ खात पडून असणार यात शंका नाही !

Advertisement

त्यातली ही मर्सिडीज... माझ्या सुत्रांनुसार ही मर्सिडीज तुम्ही निलमताईंना तिन वेळा आमदार केल्यानंतर, दुसर्‍यांदा उपसभापती केलं तेव्हा दिलेल्या दोनपैकी एक आहे ! ती मला याठिकाणी आवडलेली असुन, मी याठिकाणी आग्रहाची मागणी करतो की मला शिवसेनेत कुठलंही पद न देता निलमताईंनी तुम्हाला दिलेली ती मर्सिडीज मला हवी आहे.

Advertisement

नक्की वाचा - ABMSS: 'मराठी भाषा संतांनी टिकवली', डॉ. तारा भवाळकरांचे अध्यक्षीय भाषण गाजले

तरी याठिकाणी लवकरात लवकर ती मर्सिडीज सातारला माझ्या पत्त्यावर पोहोच करावी. एकंदरीत आत्ताची साहित्यसंमेलनातली ही तुफान विनोदाची हास्यजत्रा पहाता पुढच्या वर्षीच्या साहित्यसंमेलनात इमोशनल कथाकार रामदासजी कदम यांची मुलाखत कौशिकताई घेतील असा अंदाज माझ्या सुत्रांनी व्यक्त केला आहे. तो मराठी भाषेच्या पोस्टमार्टेमचा तुफान भयानक मनोरंजक कार्यक्रम पहायला मला या मर्सिडिजमधून जायचं आहे. तेव्हा मला ही मर्सिडिज मिळावी ही विनंती, असं किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.