
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विविध बोलींचे संमेलन आहे. पंतप्रधानांना भेट दिलेली विठ्ठलाची मूर्ती ही महाराष्ट्राच्या उदार संस्कृतीचे प्रतिक असल्याचे 98 व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.तारा भवाळकर यांनी यावेळी सांगितलं. मराठी भाषेचे महत्व संत ज्ञानेश्वर, संत एकनाथांनी मांडले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्यापूर्वी संतांनी त्यासाठी पोषक भूमी तयार केली होती असं ही त्यांनी यावेळी सांगितले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मराठी भाषा संतांनी टिकवली. भाषा जीवनात असावी लागते. भाषा जैविक गोष्ट असून, ती बोलली तर जीवंत रहाते. महाराष्ट्राला पांडुरंगांचे स्मरण मराठीतून करायला लावणाऱ्या संतांनी मराठी जिवंत ठेवली, असं स्पष्ट मत यावेळी भवाळकर यांनी व्यक्त केलं. ज्या दिवशी आईने पहिली ओवी बाळासाठी म्हटली असेल, त्या दिवशी मराठी भाषा जन्माला आली असेल. संतांनी विठ्ठलाशी संवाद साधतांना मराठी भाषेतून साधला, असं ही त्या आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या.
संत खऱ्या अर्थाने पुरोगामी विचाराचे होते. या सर्वांना मिळून मराठी भाषेचे अभिजातपण आले आहे. मराठी बोलीतून पसरली म्हणून शिवाजीमहाराजांना खेड्यापाड्यातून मावळे मिळाले होते. भाषा हे संस्कृतीचे बलस्थान असते. भाषा ही आपलेपण निर्माण करणारी, जोडणारी गोष्ट असली पाहिजे, तोडणारी नाही, असं सांगायला त्या यावेळी विसरल्या नाहीत. संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होण्यासाठी स्त्री असण्यापेक्षा गुणवत्त हा महत्वाचा आधार आहे, हे सांगताना सर्वांनीच टाळ्यांचा कडकडाट केला.
दिल्लीचे तख्त राखणारा महाराष्ट्र विचारातून, साहित्यातून जीवंत राहिला आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रेमाचा संदेश दिला जावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्रास्ताविकात श्रीमती तांबे यांनी संमेलनाच्या आयोजनाविषयी माहिती दिली.मराठी मनाचं देशाच्या राजधानीशी असलेलं नातं जवळ आणणारं हे संमेलन असल्याचे त्यांनी सांगितले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि रुकय्या मकबूल यांच्या नवकार मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शमीमा अख्तर यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव, विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर , विनय सहस्रबुद्धे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world