Medha Manjrekar Cancer News: प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर यांच्या पत्नी आणि अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी नुकतीच धक्कादायक माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. मेधा मांजरेकर यांना कॅन्सर (Cancer) या गंभीर आजाराचे निदान झाले आहे. या आजाराशी लढा देत उपचारांचा एक मोठा टप्पा पार केल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक अतिशय भावुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आजाराच्या वेदनांपेक्षा या कठीण काळात त्यांना मिळालेली साथ, प्रेम आणि ईश्वरी कृपेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिएशनचा कठीण काळ
मेधा यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये कॅन्सरचे निदान आणि त्यानंतर सुरू असलेल्या औषधोपचारांबाबत माहिती सांगितली आहे. मेधा यांनी पोस्टमध्ये लिहिलंय की, "जेव्हा मी मागे वळून पाहते, तेव्हा मला आजाराचे निदान किंवा उपचाराच्या वेदना आठवत नाहीत तर मला तो ईश्वरी आशीर्वाद आणि मला सावरणारे अदृश्य हात आठवतात." मी हा प्रवास कधीच एकटीने केला नाही, असे सांगत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
"देव माणसांच्या रूपात मदतीला आला..."
कॅन्सरसारख्या आजाराचा सामना करताना खचून न जाता मेधा यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आहे. जेव्हा जेव्हा पुढे पाऊल टाकता येणार नाही असे वाटले, तेव्हा कुणीतरी मदतीला धावून आले, असे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे. देव केवळ मंदिरात नसून तो आपले गुरू, डॉक्टर्स, नर्स, मित्रमंडळी आणि कुटुंबाच्या रूपात आपल्या पाठीशी उभा राहतो, हा अनुभव त्यांनी या काळात घेतला. "शरण जाणे म्हणजे पराभव नाही, तर तो श्रद्धेचा सर्वोच्च प्रकार आहे," अशी शिकवण गुरूंनी दिल्याचे त्यांनी नमूद केले.
(नक्की वाचा: Nitesh Rane on Aamir Khan: नितेश राणेंचा आमीर खानवर हल्लाबोल! तिसऱ्या लग्नावरून लव जिहादचा आरोप)
पती महेश मांजरेकर आणि मुलींचे मानले आभार
कुटुंबाच्या आधाराशिवाय हा लढा अपूर्ण होता. मेधा यांनी पती महेश मांजरेकर यांचे आभार मानताना लिहिले आहे की, "खंबीरपणे पाठीशी उभा राहिल्याबद्दल धन्यवाद. काही प्रवास कधीही एकट्याने करण्यासाठी नसतात." तसेच आपल्या मुलींबाबत त्या अतिशय भावुक झाल्या. "एका आईला नेहमी वाटतं की तीच आपल्या मुलांचा हात धरून चालेल पण या प्रवासाने मला शिकवलं की मुलं केव्हा आपला हात धरतात हे आपल्याला समजतच नाही," अशा शब्दांत त्यांनी मुलींनी दिलेल्या मानसिक आधाराचे कौतुक केले.
मेधा मांजरेकर यांनी शेअर केलेली पोस्ट
मित्र-मैत्रिणींनी दिला आनंद
उपचारादरम्यान जेव्हा भूक लागत नव्हती, तेव्हा त्यांच्या मित्र-मैत्रिणींनी त्यांना आवडणारे साधे पदार्थ जसे की ढोकळा, इडली, गुळपापडी आणि अचानक खावीशी वाटलेली पाणीपुरी आणून दिली. एका मैत्रिणीने क्रॅनबेरी ज्युस चक्क शॅम्पेनच्या ग्लासमधून पिण्याचा सल्ला दिला, ज्यामुळे आजाराकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला, अशी गोड आठवणही त्यांनी शेअर केली आहे. या माणसांनी एकत्र येऊन हसवत आणि प्रार्थना करत कधीच एकटे पडू दिले नाही, असे त्या म्हणाल्या.
चाहत्यांकडून प्रकृती सुधारण्यासाठी केली जात आहे प्रार्थना
मेधा मांजरेकर यांची ही हृदयस्पर्शी पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या पोस्टनंतर मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार, तसेच त्यांच्या असंख्य चाहत्यांनी कमेंट्स करून त्यांच्या धैर्याचे कौतुक केले आहे. त्या लवकरात लवकर पूर्णपणे बऱ्या व्हाव्या, यासाठी सोशल मीडियावर प्रार्थना केली जात आहे.