Nitesh Rane on Aamir Khan: बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खान याच्या नुकत्याच झालेल्या तिसऱ्या विवाहावरून आता राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महाराष्ट्राचे भाजप आमदार आणि मंत्री नितेश राणे यांनी आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावर थेट सवाल उपस्थित केले आहेत. आमिर खानचे हे लग्न म्हणजे 'लव जिहाद'चे उदाहरण आहे का, असा थेट प्रश्न राणे यांनी विचारला असून, यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
आमिर खान 'लव जिहाद'चा ब्रँड ॲम्बेसेडर होतोय का? - नितेश राणे
शिर्डी येथे पत्रकारांशी संवाद साधताना नितेश राणे यांनी हे खळबळजनक वक्तव्य केले. राणे म्हणाले, "जेव्हा प्रसिद्ध व्यक्ती त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात असे निर्णय घेतात, तेव्हा हिंदू समाजाने यावर विचार केला पाहिजे. लव जिहादचा 'ब्रँड ॲम्बेसेडर' कोण आहे? आमिर खान अशीच व्यक्ती बनत नाहीये का? जे हिंदू तरुण त्यांचे चित्रपट बघतात, त्यांनी अशा अभिनेत्यांना मोठे करण्यापूर्वी अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे." आमिर खानच्या या तिसऱ्या लग्नाकडे 'लव जिहाद'च्या दृष्टिकोनातून पाहिले जावे का, यावर आता समाजात चर्चा हळूहळू जोर धरू लागली असल्याचेही राणे यांनी यावेळी नमूद केले.
(नक्की वाचा- Kolhapur News: बाळाच्या बारशाची लगबग; नवरा, सासू-सासरे हॉल पाहायले गेले; आईने संपवलं आयुष्य)
गौरी स्प्रॅट हिच्याशी केले तिसरे लग्न
अभिनेता आमिर खानने 5 जुलै रोजी मुंबईतील वांद्रे येथील पाली हिल येथील आपल्या खाजगी निवासस्थानी अत्यंत साध्या पद्धतीने गौरी स्प्रॅट हिच्याशी विवाह केला. आमिर खानचे हे तिसरे लग्न आहे. यापूर्वी त्याचा पहिला विवाह रीना दत्ता यांच्याशी आणि दुसरा विवाह चित्रपट निर्माती किरण राव यांच्याशी झाला होता. या दोन्ही पत्नींशी घटस्फोट झाल्यानंतर आता आमिरने गौरीसोबत नवीन संसार सुरू केला आहे.
(नक्की वाचा- Ashadhi Wari 2026 Live Tracker: पालखी सध्या कुठे? एका क्लिकवर करा चेक, पुणे पोलिसांचे 24 तास 'स्मार्ट' नियोजन)
'लव जिहाद' ज्यामध्ये मुस्लिम पुरुष इतर धर्मातील महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाद्वारे त्यांचे धर्मांतर घडवून आणतात, असा आरोप केला जातो. मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या या गंभीर आणि वादग्रस्त विधानावर अभिनेता आमिर खान किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र, या वक्तव्यानंतर सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world