Nirmal Pandey : हिंदी चित्रपटसृष्टीतील असे अनेक कलाकार आहेत जे आपल्या अभिनयाने पात्रात जीव ओततात. कलाकारांच्या या अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळतात. मात्र निर्मल पांडे हे नाव अशा एका विक्रमासाठी ओळखले जाते जो आजही अबाधित आहे. 18 फेब्रुवारी 2018 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या अवघ्या 47 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
निर्मल पांडे हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एकमेव असे पुरुष कलाकार आहेत, ज्यांना एका चित्रपटासाठी 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' (Best Actress) चा पुरस्कार मिळाला आहे. अमोल पालेकर दिग्दर्शित 1997 साली आलेल्या दायरा या चित्रपटात निर्मल पांडे यांनी एका तृतीयपंथीयाची भूमिका साकारली होती. फ्रान्समधील 'वॅलेन्सिएन्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये त्यांच्या या भूमिकेसाठी त्यांना 'बेस्ट एक्ट्रेस'चा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

(नक्की वाचा- Gautami Patil: "ओंकाररावांचं नाव घेते..."; गौतमी-ओंकारचं जमलं? काय आहे गच्ची कनेक्शन?)
काय होती चित्रपटाची कथा?
या चित्रपटात सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत होती. चित्रपटाची कथा अशी होती की मुलीला मुलगा बनायचे होते आणि मुलाला मुलगी. त्यामुळे पुरस्कार देतानाही पात्राच्या लिंगानुसार निर्मल पांडे यांना 'बेस्ट एक्ट्रेस' आणि सोनाली कुलकर्णी यांना 'बेस्ट ॲक्टर'चा पुरस्कार देण्यात आला.
नैनीताल ते लंडनचा प्रवास
10 ऑगस्ट 1962 रोजी उत्तराखंडच्या नैनीतालमध्ये जन्मलेल्या निर्मल पांडे (मूळ नाव राजकुमार पांडे) यांना लहानपणापासूनच अभिनयाची ओढ होती. अल्मोडा आणि नैनीतालमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मधून अभिनयाचे धडे गिरवले. एनएसडीनंतर त्यांनी लंडनमध्ये एका थिएटर ग्रुपसोबत तब्बल 125 नाटकांमध्ये काम केले. 'हीर-रांझा' आणि 'अँटीगोन' यांसारख्या नाटकांतून त्यांनी परदेशी प्रेक्षकांचीही मने जिंकली.
'बँडिट क्वीन' ते 'हातीम'
निर्मल पांडे यांना खरी ओळख शेखर कपूर यांच्या 'बँडिट क्वीन' चित्रपटामुळे मिळाली. त्यातील 'विक्रम मल्लाह' ही त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. 'ट्रेन टू पाकिस्तान', 'इस रात की सुबह नहीं', 'प्यार किया तो डरना क्या' यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांनी 'हातीम' टीव्ही सीरियलमध्ये खलनायकाची भूमिका साकारली होती. तसेच 2002 मध्ये 'जज्बा' हा आपला म्युझिक अल्बमही लाँच केला होता.
(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world