बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी याच्या बहिणीच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पंकज त्रिपाठीच्या बहिणीच्या पतीचा जागीच मृत्यू झाला असून बहीण सविता गंभीर जखमी झाली आहे. सविता यांना धनबाद येथील SNMMCH रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंकजा त्रिपाठी यांची बहीण आणि त्यांचे पती स्विफ्ट कारने बिहारच्या गोपालगंजहून कलकत्याला जात होते. यादरम्यान झारखंडच्या धनबादच्या निरसामध्ये एनएच 19 वर दुपारी साधारण तीन ते साडे तीन दरम्यान नियंत्रण सुटल्याने कार डिवायडरला धडकली. ही धडक खूप जोरदार होती.
या अपघातानंतर स्थानिकांनी दोघांना कारमधून बाहेर काढलं. मात्र तोपर्यंत राजेश तिवारी यांचा मृत्यू झाला होता. तर पंकज त्रिपाठी यांची बहीण सविता यांच्या डोक्यावर जखम झाली असून त्या गंभीर जखमी आहेत. त्यांना त्याच अवस्थेत तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. येथे डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजेश तिवारी स्वत: कार चालवित होते. सविता यांना रुग्णालयात आणल्यानंतर त्यांच्यावर सिटी स्कॅन करण्यात आलं.
हे ही वाचा- 'जहांगिर आर्ट गॅलरीचं नाव बदलणार का?'; मुलाच्या नावावरील ट्रोलिंगनंतर चिन्मयचा मोठा निर्णय
या सिटीस्कॅनमध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचं समोर आलं आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. सविता यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याबाबतही चर्चा सुरू आहे. बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी यांनाही बहीण सविता तिवारी यांच्या अपघाताची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्यासह कुटुंबीय धनबादसाठी रवाना झाले आहेत.