जगाला आपल्या सुरांनी मंत्रमुग्ध करणाऱ्या स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनाचे सावट केवळ भारतावरच नाही, तर सीमापार पाकिस्तानातही उमटले आहे. मात्र, या महान गायिकेला श्रद्धांजली वाहणे पाकिस्तानमधील एका आघाडीच्या न्यूज चॅनेलला महागात पडण्याची शक्यता आहे. आशाजींच्या निधनाची बातमी देताना त्यांची गाणी आणि भारतीय चित्रपटांतील दृश्ये दाखवल्याबद्दल पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी ऑथॉरिटीने (PEMRA) 'जिओ न्यूज'ला नोटीस बजावली आहे.
वादाचे मुख्य कारण
पाकिस्तानात 2018 पासून भारतीय चित्रपट, गाणी आणि इतर मजकूर प्रसारित करण्यावर तेथील सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. जिओ न्यूजने आशा भोसले यांच्या निधनाचे वृत्तांकन करताना त्यांच्या अजरामर गाण्यांचा वापर केला. हा प्रकार "न्यायालयाचा जाणीवपूर्वक केलेला अवमान" असल्याचे पेमराने म्हटले आहे. या प्रकरणी 27 एप्रिल रोजी चॅनेलच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दंड, चॅनेलचे निलंबन किंवा परवाना रद्द करण्याची तरतूद पेमराच्या नियमावलीत आहे.
(नक्की वाचा- VIDEO: स्वयंचलित दरवाजे, मोठ्या खिडक्या अन् बरंच काही; अॅडव्हान्स लोकल ट्रेन मुंबईत दाखल, पण...)
जिओ न्यूजचे स्पष्टीकरण
जिओ न्यूजचे व्यवस्थापकीय संचालक अझहर अब्बास यांनी या नोटिसीला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "एखाद्या महान कलाकाराच्या आयुष्यावर अहवाल देताना त्यांच्या कामाचा आढावा घेणे ही पत्रकारितेची परंपरा आहे," असे त्यांनी म्हटले. आशाजींचे पाकिस्तानशी असलेले नाते सांगताना त्यांनी नमूद केले की, त्या नूर जहाँ यांना आपली मोठी बहीण मानत असत आणि त्यांनी नुसरत फतेह अली खान यांच्यासोबतही काम केले आहे. "युद्ध आणि संघर्षाच्या काळात कला आणि कलाकार बळी पडू नयेत. संगीत आणि कलाच लोकांना जवळ आणतात," असेही अब्बास यांनी नमूद केले.
(नक्की वाचा- Photos: ऐतिहासिक ठेवा! 'राजगृह'च नव्हे तर बाबासाहेबांचा मावळमधील बंगलाही अनेक घडामोडींचा साक्षीदार)
राजकीय वर्तुळातूनही टीका
पेमराच्या या भूमिकेवर पाकिस्तानमध्येही नाराजी व्यक्त होत आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या (PPP) नेत्या शेरी रहमान यांनी पेमराला सुनावताना म्हटले की, "सांस्कृतिक संक्रमणांवर अशा प्रकारे पोलीसगिरी करणे थांबवा."