सूरज कसबे, पिंपरी चिंचवड
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव काढले की मुंबईतील 'राजगृह' डोळ्यांसमोर येते. मात्र, पुण्याच्या मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथेही बाबासाहेबांचे एक ऐतिहासिक निवासस्थान आहे, जे अनेकांना अद्याप माहित नाही.

Dr. Babasaheb Ambedkar Pune Home
सन 1949 ते 1956 या काळात तब्बल 7 वर्षे बाबासाहेब या घरात वास्तव्यास होते. तळेगाव-चाकण रोडवरील हरणेश्वर टेकडीच्या पायथ्याशी असलेला हा बंगला आजही त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1948 साली हा बंगला 16 हजार रुपयांना खरेदी केला होता.

मावळचा निसर्गरम्य परिसर, सह्याद्रीच्या रांगा आणि जवळच असलेल्या कार्ले, भाजे व बेडसे लेण्यांचे आकर्षण असल्यामुळे बाबासाहेबांनी या जागेची निवड केली होती. जेव्हा जेव्हा बाबासाहेब पुणे मुक्कामी असायचे, तेव्हा ते या बंगल्यात बसून ज्ञानसाधना आणि वाचन करत असत.

14 एप्रिल 1951 रोजी बाबासाहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून याच बंगल्यात 'शेड्युल कास्ट फेडरेशन'ची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली होती.

या बंगल्यात आचार्य अत्रे, गो. नी. दांडेकर, संत गाडगे महाराज, शाहीर पठ्ठे बापूराव आणि कवी राजानंद गडपायले यांसारख्या दिग्गज व्यक्तींनी भेटी दिल्या होत्या.

बंगल्याच्या परिसरात बाबासाहेबांनी स्वतः लावलेली अनेक झाडे आजही डौलाने उभी आहेत.

सध्या या निवासस्थानाचे रूपांतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात करण्यात आले आहे. या ठिकाणी बाबासाहेबांनी वापरलेला टेबल, खुर्ची आणि त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगांची चित्रे जतन करून ठेवण्यात आली आहेत.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक विद्यार्थी या ठिकाणी केवळ प्रेरणा घेण्यासाठीच नाही, तर शांत वातावरणात अभ्यासासाठी देखील येतात.

हे घर म्हणजे केवळ एक वास्तू नसून ती एक 'विचारांची शाळा' असल्याचे मानले जाते. या बंगल्याचे जतन आणि व्यवस्थापन करण्यासाठी स्मारक समिती कार्यरत आहे. समितीचे उपाध्यक्ष एल. डी. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या ऐतिहासिक वास्तूचा वारसा जपला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world