
Actor Shantanu Moghe First Post After Priya Maratha Passed Away: मराठी, हिंदी मालिका क्षेत्र गाजवणारी लाडकी अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनाने संपूर्ण सिनेविश्वाला मोठा धक्का बसला होता. लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचे 31 ऑगस्ट रोजी निधन झाले. कर्करोगामुळे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी प्रियाने (Priya Marathe Death) जगाचा निरोप घेतला. प्रिया मराठेच्या निधनाने पती शंतनू मोघेलाही मोठा धक्का बसला. प्रियाच्या निधनापासून शंतनू मोघेने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता 15 दिवसानंतर शंतनू मोघेने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पहिली पोस्ट केली आहे. (Shantanu Moghe Instagram Post)
पत्नी प्रिया मराठेच्या निधनाच्या काही दिवस आधीच शंतनू मोघेने (Shantanu Moghe) नव्या प्रोजेक्टला सुरुवात केली होती. स्टार प्रवाहवरील येड लागलं प्रेमाचं (Yed lagal Premache Marathi Serial) मालिकेत तो झळकत होतो. या मालिकेचा पहिला एपिसोड आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रियाचे निधन झाले. आता पत्नीच्या निधनाच्या दुःखातून सावरुन शंतनू मोघेने पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे. त्याने येड लागलं प्रेमाचे या मालिकेचा खास प्रोमोही आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या लोकप्रिय मालिकेत शंतनू मोघे मंजिरीच्या भावाची रायाची भूमिका साकारत आहे.
भावुक प्रतिक्रिया! |Shantanu Moghe Emotional Reaction On Wife Priya Marathe Death
"मध्यंतरीच्या काळात जवळच्या व्यक्तीला वेळ देणे गरजेचे होते,म्हणून कोणत्याच कलाकृतीत दिसलो नाही. आयुष्यात आलेले ते वळण पार केल्यानंतर आता पुन्हा कामाला लागलो आहे. माझे वडील दिवंगत अभिनेते श्रीकांत मोघे मला नेहमी म्हणायचे, कलाकार मायबाप रसिकांचे असतो. वैयक्तिक आयुष्यात कितीही संघर्ष आले तरी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात कमी पडू द्यायचे नाही. व्यवसायाशी प्रामाणिक राहायचे. वैयक्तिक सुख-दुःख खुंटीला टांगून त्या-त्या व्यक्तिरेखेची सुख-दुःख आपलीशी करणं हा कलाकाराचा धर्म असतो," असं शंतनू मोघेंनी म्हटलं आहे.
तसेच "कोणत्याही परिस्थितीत कलाकृतीशी असलेली कमिटमेंट पाळायची हा कलाकारानं स्वतःशी केलेला अलिखित करार असतो. काम करत राहणं हीच प्रियाला श्रद्धांजली आहे. आजवर प्रिया आणि माझ्यावर मायबाप प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं, हीच आमची खरी ताकद आहे," अशी भावुक प्रतिक्रियाही शंतनू मोघेंनी एका माध्यमाशी बोलताना दिली. दरम्यान, त्यांच्या या मालिकेच्या पोस्टवर चाहत्यांनीही भरभरुन प्रतिक्रिया दिल्या असून अनेकांनी अभिनेत्रीची आठवण काढत दुःख व्यक्त केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world