Priya Marathe: 'ते रुप कोणी पाहावे अशी तिची इच्छा नव्हती' प्रिया मराठेचा संघर्ष सांगताना अभिजीत खांडकेकर भावुक

Priya Marathe News: अभिनेत्री प्रिया मराठेच्या जीवनातील अखेरच दिवस कसे होते, याबाबत सहकलाकार अभिजीत खांडकेकरने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय.

जाहिरात
Read Time: 4 mins
"Priya Marathe News: प्रिया मराठेचे अखेरचे क्षण कसे होते, अभिजीत खांडकेकरने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया"

Priya Marathe News: मराठी कलाविश्वातील अभिनेत्री प्रिया मराठे आता या जगामध्ये नाही, यावर अजूनही कोणाचा विश्वास बसत नाहीय. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनामध्ये खास स्थान निर्माण केले होते. प्रियाच्या अचानक झालेल्या निधनामुळे चाहत्यांसह तिच्या सहकलाकारांनाही मोठा धक्का बसलाय. "तुझेच मी गीत गात आहे" या मालिकेमध्ये अभिनेता अभिजीत खांडकेकर तिचा सहकलाकार होता, मालिकेत अभिजीत आणि प्रिया पती-पत्नीच्या भूमिकेत होते. प्रियाचे अखेरचे क्षण कसे होते, याबाबत अभिजीतने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत प्रियासोबतच्या आठवणी सांगताना तो भावुक झाला होता. 

मोजक्याच लोकांना प्रियाच्या आजाराबाबत माहिती होती : अभिजीत खांडकेकर 

"मागील दीड वर्षामध्ये प्रियाला आजार जडला आणि त्यानंतर सर्व गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होऊ लागली. याबाबत तिच्या कुटुंबीयासह म्हणजे शंतनूनंतर फार मोजक्याच लोकांना याबाबतची माहिती होती. त्यापैकी मी देखील एक होतो कारण आम्ही एकत्र काम करत होतो. प्रियाच्या निधनाच्या आदल्या दिवशीही मी तिला मेसेज केला होता, त्याआधीही आमचे बोलणं झालं होतं. त्यावेळेस ती कोणालाही भेटायला तयार नव्हती, तिची तशी इच्छा नव्हती. पण तरीही मी हट्टी मित्रासारखं तिच्या मागे लागून तिला विनंती करत होतो की तू काही बोलू नकोस, मला फक्त एकदा भेटू दे. शेवटी जे काही देवाच्या मनात असतं ते आपण बदलू शकत नाही", असे सांगताना अभिजीत भावुक झाला होता.

प्रिया आणि अभिजीत खांडकेकर पहिली भेट कुठे झाली?

प्रियासोबत झालेल्या पहिल्या भेटीबाबत अभिजीतने सांगितलं की, घोडबंदर परिसरात वेगवेगळ्या मालिकांचे शुटिंग सुरू असते. तर पाठवलेल्या पत्त्यावर मी गेलो, तेथे सर्वच बंगले एकसारखे दिसत होते. शुटिंग सुरू असलेल्या एका बंगल्यामध्ये मी गेलो तिथे अचानक प्रिया मला दिसली आणि मला कळलं की आपण चुकीच्या सेटवर आलोय. तर तेव्हा ओळखीचा चेहरा म्हणून आम्ही एकमेकांना हाय वगैरे केले आणि ती आमची पहिली भेट. यानंतर "तुझेच मी गीत गात आहे" या मालिकेच्या निमित्ताने आम्ही भेटलो तेव्हाही आम्हाला ही गोष्ट आठवली.   

कॅन्सर पुन्हा बळावलाय हे प्रियाला केव्हा कळलं? अभिजीत म्हणाला...

आमच्या सेटवर दोन नाही तर तीन लहान मुली होत्या, प्रियाही त्यापैकी एक होती. प्रिया फार जवळची मैत्रीण झाली होती. अशातच आपल्या नजरेसमोर एखाद्या व्यक्तीची तब्येत ढासळत जाणे हे फार चटका लावणारे आहे. एका आजारादरम्यान चेकअपच्या निमित्ताने काही गोष्टी समोर आल्या. त्यावेळेस तिने मला धास्तीने काही सांगितलं होते की अरे असं-असं असल्याचं मला वाटतंय. मित्र म्हणून आपण आपल्या दोस्तांना दिलासा देतो, मीही तेच केलं. प्रियाला म्हटलं की, सर्व काही सामान्य आहे. डॉक्टरांना विचार... काही तरी मार्ग असेल... तू यातून बाहेर पडशीलच असे मी तिला म्हटलं. तर त्यावेळेस प्रिया हे सर्व कोणालाही कळू द्यायचे नव्हते आणि तिने मला तशी विनंतही केली होती. तर सेटवर काय होतं एखादी व्यक्ती का बरं दमतेय? का बरं सुट्या घेतेय? अशा गोष्टी विचारल्या जातात. या गोष्टी प्रियाला शक्यतो कळू द्यायच्या नव्हत्या, त्यामध्ये ती तिच्यासोबत कायमच होतो. पण एकंदरच औषधोपचारांमुळे तिची तब्येत जाणवायला लागली, त्याचा तिला त्रासही होत होता, असेही अभिजीतने सांगितलं. 

Advertisement

(नक्की वाचा: Priya Marathe News: 'अचानक आलेली तब्येतीची अडचण... तोपर्यंत थोडीशी विश्रांती घेते' प्रिया मराठेने या व्हिडीओतून प्रकृतीची दिली होती माहिती)

दोन वाक्यं बोलणंही प्रियाला कठीण जात होते: अभिजीत खांडकेकर

आजारादरम्यान प्रिया दोन व्यावसायिक नाटकं आणि त्यासह मालिका करत होती. त्यात या मालिकामध्ये मोनिकासारखं कॅरेक्टर, ज्यासाठी अतिशय तावातावाने बोलायचं. दुसरीकडे ही मुलगी अशा काही ट्रीटमेंट्स घेत होती जेथे माणसं दिवसदिवस झोपून राहतात इतकी तुमच्यामध्ये ताकद नसते. असे असताना ही व्यक्ती स्वतः गाडी चालवून शुटिंगला येत असे. दोन्ही नाटकांमध्येही तिची आव्हानात्मक भूमिका होती. इतकी पल्लेदार वाक्यं इतक्या सफाईदारपणे घेणारी प्रिया शेवटच्या काही दिवसांमध्ये तिला दोन वाक्यं सुद्धा बोलणं फार कठीण झालं होते. मित्र म्हणून तिनं अजून थोडा वेळ असायला हवं होते, असंही वाटतं आणि कदाचित ती सुटली ते बरंही झालं असंही वाटतं, असेही अभिजीत म्हणाला.

Advertisement

(नक्की वाचा: Priya Marathe News: शंतनूच्या नव्या मालिकेचा एपिसोड प्रियाने पाहिला, अन् दुसऱ्या दिवशी... सुबोध भावेने सांगितलं त्या रात्री नेमकं काय घडलं)

Advertisement

ते रुप कोणी पाहू नये तिच्या मनामध्ये असावं: अभिजीत खांडकेकर

अभिजीतने प्रियाच्या जीवनातील अखेरच्या दिवसांबाबत सांगितले की, "तुझेच मी गीत गात आहे " मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर प्रियाच्या घरी आम्ही पार्टी केली, खूप गप्पा मारल्या. तेव्हा ती मला म्हणाली की, मला माहिती नाही पुढे कितपत शक्य होईल न होईल. पण सर्वांना घरी बोलवून एन्जॉय करता आलं तर छान वाटेल. कोणत्याही अभिनेत्रीला स्क्रीनवर जसे दिसतोय तसे किंवा आपण जास्तीत जास्त छान दिसावं, असे वाटतं. त्यात हा रोग इतका घाणेरडा आहे आणि तो दुश्मनालाही होऊ नये. कारण हा आजार पूर्णपणे रया घालवतो, तुमच्या तब्येतीचा ऱ्हास होतो. तर शेवटच्या काळात प्रियाच्या मनात असावं की ते रुप कोणी पाहू नये आणि त्या निर्णयाचा आम्ही आदरही केला. फोटो-व्हिडीओ कॉल तर दूरची गोष्ट आहे पण प्रत्यक्ष जाऊन तिला भेटणारे फार मोजकेचे लोक होतो. निधनाची बातमी आल्यानंतरही तिला त्या अवस्थेत पाहणं माझ्यासाठी फार कठीण होतं. कारण तिला सुंदर नटलेले पाहिलंय."

प्रिया मराठेचे 31 ऑगस्ट 2025 रोजी निधन झाले. वयाच्या 38व्या वर्षी तिने अखरेचा श्वास घेतला. कॅन्सर आजाराविरोधातील तिची झुंज अपयशी ठरली.