Pune News : ज्येष्ठ गायिका आशा भोसले आज अनंतात विलिन झाल्या. वयाच्या ९२ व्या वर्षी आशा भोसले यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर आशा भोसले आणि लता मंगेशकर यांचे अनेक किस्से समोर आले आहेत. दरम्यान पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे.
लता दीदी आणि आशा ताई आल्या एकत्र....
नांदोशी येथे उभारण्यात येणाऱ्या लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या प्रस्तावित रुग्णालयाला आता नवं नाव देण्यात आलं आहे. ‘लता मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस'ऐवजी ‘लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस' असं नामकरण करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे.
ख्यातनाम पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमात बदल करण्यात आले आहेत. पूर्वनियोजित कोनशिला समारंभाऐवजी आता ‘संकल्प आणि श्रद्धांजली सभा' आयोजित केली जाणार आहे. ही सभा येत्या गुरुवारी, १६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता सिंहगड रस्त्यावरील प्रकल्पस्थळी होणार आहे. ही सभा केवळ निमंत्रितांसाठीच खुली राहणार आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी मोहन भागवत असतील. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. तसेच मंगेशकर आणि भोसले कुटुंबीयांचीही उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमात रुग्णालय उभारणीचा संकल्प व्यक्त करण्यात येणार असून, त्याच वेळी आशाताईंना श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल. लता मंगेशकर आणि आशा भोसले या भारतीय संगीतविश्वातील अजरामर व्यक्तिमत्त्वांना अभिवादन करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दरम्यान, कार्यक्रमाच्या निमित्ताने सायंकाळी ४ वाजता संगीत सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विभावरी जोशी यांचे गायन, तसेच शंतनु गोखले (संतूर), अमर ओक (बासरी) आणि पांडुरंग पवार (तबला) यांचे वाद्यसंगीत सादर होणार आहे. ही सभा आरोग्यसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात आणि संगीताच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली ठरणार आहे