'कुरळे ब्रदर्स' पुन्हा भेटीला येणार; ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’च्या रिलीजची तारीख ठरली

Punha Sade Made Teen Release Date: नुकत्याच झळकलेल्या नवीन पोस्टरमध्ये अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे हे कुरळे ब्रदर्स त्यांच्या नेहमीच्या अवखळ अंदाजात दिसत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Punha Sade Made Teen: मराठी चित्रपटसृष्टीतील अविस्मरणीय ठरलेल्या  ‘साडे माडे तीन' या चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या मनात आजही ताजा आहे. कुरळे ब्रदर्सची भन्नाट केमिस्ट्री, त्यांचे एकमेकांवरील प्रेम आणि पोट धरून हसायला लावणारे किस्से, या सगळ्यामुळे हा चित्रपट महाराष्ट्राला भावला. आता त्याच चित्रपटाचा दुसरा भाग ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन' लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. येत्या १४ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांची उत्सुकता आता प्रचंड शिगेला पोहोचली आहे.

नुकत्याच झळकलेल्या नवीन पोस्टरमध्ये अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे हे कुरळे ब्रदर्स त्यांच्या नेहमीच्या अवखळ अंदाजात दिसत आहेत. त्यांच्यासोबत सिद्धार्थ जाधवही आहे. या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे खट्याळ भाव, त्यांचा भन्नाट लूक पाहून पुन्हा एकदा हास्याचा महापूर येणार हे स्पष्ट जाणवतं. या धमाल चौकडीत रिंकू राजगुरूचाही ताजातवाना अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

(नक्की वाचा-  प्रसिद्ध अभिनेत्रीचा भीक मागतानाचा Video Viral, डफली वाजवत गायलं सलमानचं गाणं)

दिग्दर्शक अंकुश चौधरी म्हणाला की, "या वेळची जबाबदारी जास्त मोठी होती. पहिल्या भागामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र कलाकार, निर्माते, पटकथा आणि संवाद लेखक संदीप दंडवते आणि तंत्रज्ञ यांच्या प्रचंड मेहनतीमुळे आम्ही त्या अपेक्षांना न्याय देऊ शकलो आहोत. हा चित्रपट एक कौटुंबिक मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज आहे.”

निर्माते अमेय खोपकर यांनी म्हटलं की, ‘साडे माडे तीन' या चित्रपटाचा पहिला भाग लोकप्रिय ठरला होता. त्यामुळे प्रेक्षकांना कुरळे ब्रदर्सना पुन्हा भेटण्याची प्रचंड इच्छा होती. आम्ही तो क्षण घेऊन आलो आहोत. उत्कृष्ट कलाकार, मेहनती दिग्दर्शक आणि ताकदीची तांत्रिक टीम यांच्या सहकार्याने या दुसऱ्या भागात हास्याचा डबल डोस मिळणार आहे. प्रेक्षक पुन्हा एकदा पोट धरून हसतील याची खात्री आहे.'' 

Advertisement

(नक्की वाचा - Kartik Aaryan: कार्तिक आर्यन बनला 'अलिबागकर'; प्रसिद्ध प्रकल्पात घेतली इतक्या कोटींची जमीन)

अंकुश चौधरी यांची कथा, संदीप दंडवते यांची पटकथा आणि संवाद लाभलेल्या या चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू, संकेत पाठक, संजय नार्वेकर, समृद्धी केळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे छायाचित्रण प्रसिद्ध छायाचित्रकार संजय जाधव यांनी केले असून येत्या १४ नोव्हेंबर रोजी ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.