Siddharth Jadhav News: महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड कुतूहल निर्माण झालंय. आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नव्या पोस्टरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढवलीय. सिनेमातील एका स्टार अभिनेत्याचा भन्नाट लुक लाँच करण्यात आलाय. सिनेमाचं लुकसाठी अभिनेत्याने केलेले ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते अवाक झाले आहेत.
कोण आहे हा अभिनेता?
हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून सर्वाचा लाडका सिद्धू म्हणजे सिद्धार्थ जाधव आहे. विशेष म्हणजे सिद्धार्थच्या वाढदिवशीच 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमातील त्याचा लुक प्रेक्षकांसमोर आणण्यात आलाय. सिद्धार्थचा हा लुक आतापर्यंत सर्वच भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. चेहऱ्यावरील रक्त, व्रण, उरात धडकी भरवणारी नजर आणि त्या नजरेत दडलेलं क्रोर्य असे आक्राळविक्राळ रूप असलेला सिद्धार्थ जाधव या पोस्टरमध्ये दिसत आहे. लुक पाहून सिनेमामध्ये सिद्धार्थची भूमिका नेमकी काय असणार आहे, याबाबत प्रेक्षकांची उत्कंठा वाढलीय.
भूमिकेबाबत सिद्धार्थ जाधव काय म्हणाला?
भूमिकेबद्दल सिद्धार्थ जाधवने सांगितले की,"भूमिकेबद्दल सांगायचं तर ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटातील माझी ही भूमिका माझ्या आजवरच्या कारकिर्दीमधली सगळ्यात वेगळी आहे. या पात्रामध्ये जी क्रूरता आहे ती त्याच्या लुकमध्ये उतरणं खूप गरजेची होती. माझ्या या लुकचं पूर्ण श्रेय महेश सरांचं आहे. त्यांनी मला माझा एक फोटो पाठवायला सांगितला आणि त्यावर काम करून माझा हा लुक तयार केला. जेव्हा हा लुक माझ्याकडे आला, तेव्हा मी स्वतःच थक्क झालो. मी असाही दिसू शकतो? असा प्रश्न मला पडला. अशा प्रकारची भूमिका मी यापूर्वी कधीच साकारली नाही. परंतु माझा महेश सरांवर पूर्ण विश्वास असल्याने मी सुद्धा या भूमिकेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. सध्यातरी मी भूमिकेविषयी जास्त काही बोलू शकत नाही, परंतु मला खात्री आहे की, प्रेक्षकांना माझं हे रूप नक्कीच आवडेल."
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा कधी होणार रिलीज?
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' येत्या 31 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सिद्धार्थ बोडके छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. याव्यतिरिक्त चित्रपटात विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने ,नित्यश्री ज्ञानलक्ष्मी, सयाजी शिंदे आणि सिद्धार्थ जाधव हे मातब्बर कलाकार पाहायला मिळणार आहेत. याशिवाय राष्ट्रीय पुरस्कार विजेते बाल कलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. महेश मांजरेकर यांची कथा, पटकथा असलेल्या या चित्रपटाचे संवादलेखन सिद्धार्थ साळवी यांनी केले आहे. तर राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध हे सिनेमाचे निर्माते आहेत.
(नक्की वाचा: Entertainment News: जटा, शरीरावर भस्म, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा... बड्या दिग्दर्शकाची का झाली अशी अवस्था?)