'सोसाइटी में घाटी लोगों को नहीं रखते...मराठ्यांचा दणका दाखवला का', पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमाचा दमदार टीझर

Punha Shivaji Raje Bhosale Teaser: पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमाचा टीझर पाहिला का? सिनेमा बॉक्सऑफिसवर कधी झळकणार? वाचा सविस्तर वृत्त...

जाहिरात
Read Time: 3 mins
Punha Shivaji Raje Bhosale Teaser: पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमाचा दमदार टीझर
Punha Shivaji Raje Bhosale Movie

Punha Shivaji Raje Bhosale Teaser : "स्वराज्याचं रक्षण करायला राजे पुन्हा येत आहेत!" या दमदार घोषणेमुळे संपूर्ण महाराष्ट्र विलक्षण सिनेमाची आतुरतेने वाट पाहतोय. महेश मांजरेकर लिखित-दिग्दर्शित 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा सिनेमा 31 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा टीझर नुकतेच एका दिमाखदार सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला. आजवर कधीच दिसलं नाही असे छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रखर रूप या सिनेमामध्ये दिसणार असून मराठी भाषेची अस्मिता, बळीराजाच्या आत्महत्येचा मुद्दा, मराठी माणसांचं मुंबईतील स्थान, परप्रांतीयांची मुजोरी अशा अनेक विषयांवर महाराजांचं भाष्य आणि कृती सिनेमाद्वारे पाहायला मिळणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार? 

सिद्धार्थ बोडके सिनेमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सोबतीला विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, नित्यश्री अशी कलाकारांची तगडी फौज आहे. याशिवाय राष्ट्रीय पुरस्कार विजेते बाल कलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा – पटकथा महेश मांजरेकर यांची असून संवादलेखन सिद्धार्थ साळवी यांनी केले आहे. हा सिनेमा केवळ ऐतिहासिक व्यक्तिरेखेचा गौरव न करता, आजच्या महाराष्ट्राशी आणि त्याच्या अनुत्तरित प्रश्नांशी संवाद साधत असल्याचे टीझरवरून कळतेय.

आजच्या समाजाशी भिडण्याचा प्रयत्न : महेश मांजरेकर

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सिनेमाविषयी सांगितले की, "माझ्यासाठी हा चित्रपट म्हणजे आजच्या समाजाशी भिडण्याचा प्रयत्न आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांनी केवळ स्वराज्य उभं राहिलं नाही, तर एक जनमानस जागृत झाले. आजच्या पिढीपुढे असलेल्या प्रश्नांकडे पाहाताना, त्याच विचारांचा प्रकाश पडद्यावर आणायचा आहे. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा प्रवास इतिहास सांगणारा असेलच. त्याचबरोबर वर्तमानाला प्रश्न विचारणारा, त्याला जागवणारा आणि दिशा दाखवणारा ठरेल. कलाकार म्हणून मी गप्प बसू शकत नाही आणि हा सिनेमा माझ्या अस्वस्थतेचा, माझ्या जिव्हाळ्याचा आवाज आहे."

(नक्की वाचा: Nitish Bharadwaj News: महाभारताचे श्रीकृष्णच अडकले आयुष्याच्या चक्रव्युहात, पोटची मुलंच म्हणतात : तुम्हाला बाबा म्हणायला लाज वाटते)

चित्रपटातून महाराज बोलणार आहेत: बवेश जानवलेकर

झी स्टुडिओज् मराठी व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले,"झी स्टुडिओज् आणि महेश मांजरेकर हे समीकरण कायमच यशस्वी राहिलंय. मराठीसाठी 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा केवळ एक चित्रपट नसून महाराष्ट्राच्या इतिहासाशी आणि संस्कृतीशी पुन्हा नातं जोडणारा प्रवास आहे. या सिनेमाशी जोडल्या गेल्याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. या चित्रपटातून महाराज बोलणार आहेत, त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी नसून जगण्याचा प्रयत्न करण्यास भाग पाडणारा आहे."

Advertisement

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणं मोठी जबाबदारी : सिद्धार्थ बोडके

आपल्या भूमिकेविषयी अभिनेता सिद्धार्थ बोडके म्हणाला की, "छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणं ही एक मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी मी पार पाडू शकेन, असा विश्वास महेश सरांनी माझ्यावर दाखवला, यासाठी मी मनापासून कृतज्ञ आहे. प्रत्येक भूमिकेसाठी आपण अभ्यास करतोच, पण या चित्रपटातील माझा प्रवास विशेष होता. यात दाखवलेले शिवाजी महाराज हे प्रचंड संतप्त आहेत. कारण आज आपल्या महाराष्ट्राची, मराठी माणसाची जी स्थिती आहे ती पाहून कोणाच्याही मनात राग निर्माण होईल. हे वास्तव जेव्हा या चित्रपटाच्या माध्यमातून माझ्या समोर आलं, तेव्हा मी अस्वस्थ झालो, जर आज महाराजांनी ही परिस्थिती पाहिली असती, तर त्यांची भूमिका काय असती? हाच भाव मी या चित्रपटातील माझ्या अभिनयातून प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे."

(नक्की वाचा: Parzaan Dastur Photos: 'कुछ कुछ होता है' फेम सायलेंट सरदारजीचे 10 फोटो, या तरुणीसोबत केलं लग्न)

'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पहात आहेत.