
बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या 'रेड 2' ने पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे. त्यामुळे चित्रपटाची कमाई 3 दिवसांत वाढतच चालली आहे. हे पाहून अजय देवगणला 'सिक्वेल किंग' म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण यापूर्वी त्याने 'दृश्यम'च्या सिक्वेललाही हिट केले आहे. त्याचबरोबर 2018 मध्ये आलेल्या राजकुमार गुप्ता दिग्दर्शित 'रेड'चा सिक्वेल 'रेड 2' देखील हिट होण्याच्या मार्गावर दिसत आहे. या चित्रपटाने केवळ 3 दिवसांत भारतात 50 कोटींच्या कमाईचा टप्पा ओलांडला आहे. तर जगभरातील आकडेवारी 60 कोटींच्या दिशेने वाटचाल करत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, 'रेड 2' ने पहिल्या दिवशी 19.25 कोटींची कमाई केली. कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या सुट्टीचा फायदा झाला. तर दुसऱ्या दिवशी हा आकडा 12 कोटींवर पोहोचला होता. त्यानंतर तिसऱ्या दिवशीची कमाई 18 कोटींपर्यंत गेली आहे. यामुळे 'रेड 2' ची भारतात एकूण कमाई 49.25 कोटींवर पोहोचली आहे. तर जगभरातील आकडा 60 कोटींपर्यंत पोहोचला आहे.
विशेष म्हणजे 7 वर्षांनंतर अजय देवगण 'रेड 2' मध्ये आयआरएस अधिकारी अमय पाठकच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याचा सामना मनोहर धानकर म्हणजेच दादा मनोहर भाई यांच्याशी होताना दिसत आहे. ही भूमिका रितेश देशमुख साकारत आहे. तर वाणी कपूर, रजत कपूर, सौरभ शुक्ला, सुप्रिया पाठक आणि अमित सियाल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका यात आहेत.
2018 मध्ये आलेल्या 'रेड'बद्दल बोलायचं झाल्यास, अभिनेत्री इलियाना डिक्रूजने अजय देवगणच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारली होती. तर या सिक्वेलमध्ये वाणी कपूर या भूमिकेत दिसत आहे. मात्र, या बदलामुळे चाहते फार खूश दिसत नाहीत. असं असलं तरी चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळाल्याचे बोलले जात आहे. अजय देवगणचा बऱ्याच दिवसानंतर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world