अभिनेत्री रिमी सेन, जिने 'धूम', 'हंगामा' आणि 'गोलमाल' यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले, ती सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. चित्रपटसृष्टीपासून दूर गेलेली रिमी आता दुबईमध्ये एक यशस्वी *रिअल इस्टेट व्यावसायिक* म्हणून आपली ओळख निर्माण करत आहे. रिमीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भारताच्या तुलनेत दुबईतील व्यवसाय पद्धती कशी सोपी आहे, यावर रोखठोक भाष्य केले आहे.
रिमी सेनने अभिनयाला रामराम ठोकत दुबईत रिअल इस्टेटचा व्यवसाय सुरू केला आहे. दुबईतील शिस्तबद्ध प्रणालीचे कौतुक करताना तिने भारताच्या कर प्रणालीवर आणि सतत बदलणाऱ्या सरकारी धोरणांवर टीका केली आहे.
बॉलिवूड ते दुबईचा रिअल इस्टेट व्यवसाय
२००० च्या दशकात घराघरांत पोहोचलेली रिमी सेन दीर्घकाळापासून मोठ्या पडद्यावरून गायब होती. मात्र, आता ती दुबईतील 'रिअल इस्टेट' मार्केटमध्ये एक उद्योजिका म्हणून सक्रिय झाली आहे. 'बिल्डकॅप्स रिअल इस्टेट' सोबत बोलताना तिने दुबईतील अनुभव शेअर केले.
(नक्की वाचा- VIDEO: अभिनेता अक्षय कुमारच्या ताफ्यातील कारचा भीषण अपघात! कार उलटली; गाड्यांचा चुराडा)
"भारत आता व्यवसायासाठी अनुकूल देश राहिलेला नाही"
रिमीने भारताच्या व्यवसाय धोरणांवर सडकून टीका केली. तिचे म्हणणे आहे की,भारतात सरकार रात्रीतून धोरणे बदलते, ज्यामुळे सामान्य लोकांचे आणि व्यावसायिकांचे आयुष्य कठीण होते. भारतात हजारो प्रकारचे टॅक्स आणि गुंतागुंत आहे, त्यामुळे तो आता 'बिझनेस फ्रेंडली' देश राहिलेला नाही. दुबईत ९५% लोक परदेशी आहेत. तिथे प्रत्येक कामासाठी एक सिस्टिम आहे. एजंटना तिथे फायनान्शिअल कन्सल्टंटसारखा मान दिला जातो. तर भारतात ब्रोक्रेज मागितले तरी लोकांकडे गुन्हेगारासारखे पाहिले जाते.
बोटॉक्स आणि प्लास्टिक सर्जरीच्या चर्चांवर स्पष्टीकरण
काही काळापूर्वी रिमीचे सोशल मीडियावरील फोटो पाहून तिने प्लास्टिक सर्जरी केल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर रिमीने स्पष्टपणे सांगितले की, "मी कोणतीही प्लास्टिक सर्जरी केलेली नाही. मी फक्त फिलर्स (Fillers), बोटॉक्स (Botox) आणि पीआरपी (PRP) ट्रीटमेंट घेतली आहे. जर लोकांना मी सुंदर दिसतेय असे वाटत असेल तर चांगली गोष्ट आहे. शिस्तबद्ध जीवनशैली आणि या उपचारांमुळे कोणीही चांगले दिसू शकते."