सुपरस्टार रितेश देशमुख म्हणाला - NDTV मराठी लय भारी

NDTV Marathi : सुपरस्टार रितेश देशमुखचा 'NDTV मराठी'चा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आणि यानंतर रितेश देशमुखची खास मुलाखत देखील घेण्यात आली. 

Advertisement
Read Time: 7 mins

'NDTV मराठी'  या वृत्तवाहिनीचे लोकार्पण महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती दर्शवली. यासह अनेक दिग्गजांसह सेलिब्रिटींनी सोहळ्यास हजेरी लावून 'NDTV मराठी' वृत्तवाहिनीला शुभेच्छा दिल्या. यावेळी सुपरस्टार रितेश देशमुखचा 'एनडीटीव्ही मराठी'चा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आणि यानंतर रितेश देशमुखची खास मुलाखत देखील घेण्यात आली.  रितेशने त्याच्या गाजलेला 'लय भारी' या मराठी सिनेमातील डायलॉग म्हणत 'NDTV मराठी' वृत्तवाहिनीला शुभेच्छा दिल्या. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अभिनेता रितेश देशमुखची खास मुलाखत

प्रश्न -रितेश देशमुख तू खऱ्या अर्थाने मॉर्डन महाराष्ट्रीयन, मॉर्डन मराठी भूमिपूत्र आहेस. तू ज्या गोष्टींना स्पर्श करतोस त्यामध्ये तुला यश मिळते आहे. एनडीटीव्ही मराठी वृत्तवाहिनीसोबत तुझा प्रवास सुरू झाला आहे? त्याबाबत काय सांगशील...

रितेश देशमुख - महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! खरेतर मराठी माणसासाठी आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि याच पवित्र दिनीच 'एनडीटीव्ही मराठी'ची सुरुवात होत आहे. सर्व टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मराठी पत्रकारितेत नवीन आवाज यावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा होती. ती इच्छा आता पूर्ण होत आहे. याचा मला खरंच अतिशय आनंद आहे आणि अभिमान आहे की कुठेतरी मी या गोष्टीशी जोडलो गेलो आहे.

Advertisement

(नक्की वाचा :  'नव्या महाराष्ट्राचा नवा आवाज', NDTV मराठीचं शानदार लोकार्पण)

प्रश्न - अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शकापर्यंत सर्व भूमिकांची टोपी तू घातलेली आहेस आणि या सर्व क्षेत्रांमध्ये यशही मिळवले आहेस, हा प्रवास कसा होता?

रितेश देशमुख - दुसऱ्यांना टोप्या घालण्याऐवजी त्याच टोप्या मी घातल्या. खरे म्हणजे मला अभिनेता व्हायचे नव्हते. पण एक संधी मिळाली, ती मी स्वीकारली आणि अभिनेता झालो. 10 वर्ष या इंडस्ट्रीमध्ये लोकांचे प्रचंड प्रेम मिळाले आणि त्यानंतर निर्माता व्हावे, असा मी विचार केला.  यामागे माझ्या वडिलांचा हात होता. कारण ते म्हणायचे की तू हिंदीमध्ये बरेच काही करत आहेस, मराठीसाठी काय करणार आहेस?  आणि मग मुंबईमध्ये फिल्म कंपनीची स्थापना झाली. गेल्या दहा वर्षांमध्ये सहा चित्रपटांची निर्मिती आम्ही केली. सहाचे सहा मराठी चित्रपट आहे, याचा मला जास्त अभिमान आहे.

Advertisement

(नक्की वाचा : "आमचं सरकार आल्याने अडीच वर्षांची नकारात्मकता गेली"; 'NDTV मराठी'वर CM एकनाथ शिंदेंची खास मुलाखत)

प्रश्न - मराठी असूनही जी भव्यता तू तुझ्या चित्रपटांमध्ये आणलीस मग ते सिनेमेटोग्राफी, प्रोडक्शन, प्रमोशन असो; या सर्व गोष्टींचा विस्तार केलास तर मराठी फिल्म इंडस्ट्रीतील तुझा अनुभव कसा होता?

रितेश देशमुख - निश्चितच ही निवड जाणीवपूर्वक केलेली होती. कारण हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आपण काम करतो, तेव्हा ते काम एका स्केलवर केले जाते. त्यामध्ये बरेच काही शिकण्यासारखे आहे. तिथे सिनेमेटोग्राफर, टेक्निशिअन असतील, तर ते टेक्निशिअन्सना सोबत घेऊन मोठे प्रोडक्ट तयार करतात. पण मराठी सिनेमामध्ये ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस बजेटच्या मर्यादा असतात आणि तुमची इच्छा असून त्या सर्व गोष्टी तुम्हाला करता येत नाहीत. मर्यादितरित्या सर्व गोष्टी कराव्या लागतात. मला असे वाटले की कुठेतरी आपण तेथे जाऊन हा स्केल वाढवावा, असा माझा हेतू होता आणि मला वाटते असाच हेतू एनडीटीव्हीचा देखील आहे की मराठी म्हटले रिजनल म्हटले तर स्केल कमी होतो पण हा स्केल कसा मोठा करावा? कशा मोठ्या बातम्या घेऊन याव्यात? त्याच पद्धतीने मराठी चित्रपटामध्ये यापुढे देखील प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन करावे आणि नवीन लोकांना संधी देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. हे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जातात.  

Advertisement

प्रश्न - तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये किती वर्ष झाली आहेत?

रितेश देशमुख - मी इंडस्ट्रीमध्ये 22 वर्ष पूर्ण केली आहेत. 

प्रश्न - संपूर्ण देशामध्ये मराठी मनोरंजन, मराठी नाटक व मराठी सिनेसृष्टी अग्रगण्य होती. तर दादासाहेब फाळकेंच्या काळापासून एक प्रेक्षक म्हणून किंवा 22 वर्षांमध्ये जे चांगला कॉन्टेट क्रीएट करत आहेत, त्यामध्ये काय फरक जाणवला?

रितेश देशमुख - मला वाटते की मराठी चित्रपट हा नेहमीच कॉन्टेंट ओरिएन्टेंड राहिलेला आहे. पण मी नेहमी जसे म्हणतो की केवळ कॉन्टेंट ओरिएन्टेंड राहून चालणार नाही. आपल्याला व्यवसायाचाही (Commerce) विचार करावा लागेल. कोणतीही गोष्ट टिकवायची असेल आणि आर्थिक पाठबळ नसेल तर ती टिकणार नाही. मराठी चित्रपटांमध्ये आपल्याला हा समतोल शोधण्याची गरज आहे. आपण कॉन्टेंट चांगला देण्याचा प्रयत्न करतोय. पण त्याचे कितपत कर्मशिअल करता येईल किंवा तुम्ही जो कॉन्टेंट लोकांपर्यंत घेऊन जाणार आहात तो पाहण्यासाठी लोकांचा इंटरेस्ट आहे का? किंवा त्यांचा इंटरेस्ट कसा आपल्याला वाढवता  येईल? या सर्व गोष्टींकडे आपल्याला लक्ष देण्याची गरज असते आणि हे महत्त्वाचे आहे, हाच धडा मी घेतला. 

लहानपणी जेव्हा आम्ही चित्रपट पाहायला जायचो, तेव्हाही मोठमोठ्या चित्रपटांची निर्मिती व्हायची. त्यावेळेस 'अशी ही बनवाबनवी' हा सिनेमा असेल, मल्टिस्टारर सिनेमे असतील. महेश कोठारेजींचे चित्रपट असतील, ज्यांनी मल्टिस्टारर अ‍ॅक्शन चित्रपटांची निर्मिती केली. सचिन पिळगावकरजी, अशोक सफारजी, दादा कोंडकेजी, लक्ष्मीकांत बेर्डेजी हे त्या काळातले सुपरस्टार आहेत. त्यांनी खरेच एक कर्मिशअल प्रोग्रेशन त्या काळात चित्रपटांना दिले होते. नक्कीच व्ही शांतारामजी यांना विसरता येणार नाही, त्यांनी देशातील चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

पण मधे असा काळ आला की मराठी चित्रपट चालत नव्हते, लोक चित्रपटगृहांमध्ये जात नव्हते. मराठी भाषिक प्रेक्षक हे हिंदी चित्रपटांकडे वळले आणि ठीकेय कुठेतरी आपण कमी पडलो, असे गृहीत धरले पाहिजे. त्यानंतर गेल्या दहा वर्षांमध्ये पाच-सहा चित्रपट असे आले, खरंच त्या चित्रपटांनी रेकॉर्डब्रेक कमाई केली किंवा नवीन दिशा देण्याचा प्रयत्न केला. तिच दिशा आपल्याला घेऊन पुढे जाण्याची आवश्यकता आहे. मला आठवतंय माझा पहिला मराठी चित्रपट 'लय भारी'ने जवळपास 40 कोटी रुपयांची कमाई केली आणि हा सिनेमा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. लोकांनी प्रचंड प्रेम दिले. याबाबत मी सर्वांचा आभारी आहे. तर सांगायचा दृष्टीकोन हा आहे की तो एक चित्रपट आला त्यानंतर 'नटसम्राट' सिनेमा आला, या सिनेमाने 'लय भारी' सिनेमाचा रेकॉर्ड मोडला. यानंतर सैराटने जवळपास 100 कोटी रुपयांची कमाई करून मोठा विक्रम केला. यानंतर सहा-सात वर्षे असे मोठे सिनेमे आलेच नाहीत. 

प्रश्न - सिनेइंडस्ट्री वगळता स्वतःचे स्टार्टअप आणण्याचे कसे ठरवले?

रितेश देशमुख - मी आणि जिनिलियाने 'इमॅजिन फुड' कंपनी सुरू केली आहे. या कंपनीद्वारे आम्ही प्लाँट बेस्ड प्रोटीन-विगन-कोलेस्ट्रॉल फ्री पदार्थांचा पुरवठा करतो. काही लोक मांसाहार करतात, पण ते कोलेस्ट्रॉलच्या समस्येने ग्रासलेले असतात. तर शाकाहारी पदार्थांद्वारे शरीराला प्रोटीन जास्त प्रमाणात मिळत नाही. याच पार्श्वभूमीवर आम्ही विगन फुड प्रोडक्ट्स लाँच केले. मी मांसाहारी होतो, आठ वर्षांपूर्वी मांसाहार करणे बंद केले. जिनिलिया आणि मी अमेरिकेमध्ये असताना, तेथे प्लाँट बेस्ड मीट खाल्ले होते आणि मला ते आवडले. हे आपल्या देशात का उपलब्ध नाही? असा विचार डोकावला. मग कोणाची तरी वाट पाहण्यापेक्षा आम्हीच रीसर्च केले. जर्मनीमध्ये प्रयोगशाळेत संशोधकांसोबत काम केले आणि मग हे प्रोडक्ट लाँच केले.  

LET'S स्टार्टअप IN महाराष्ट्र NDTV मराठीची मोहीम - या कार्यक्रमाबाबत काय म्हणाला रितेश?

रितेश देशमुख - 'LET'S स्टार्टअप IN महाराष्ट्र NDTV मराठीची मोहीम' या शोची खरंच गरज आहे. कारण बरेचसे लोक आहेत, ज्यांची स्टार्टअप उभारण्याची इच्छा असते पण ते घाबरलेले असतात. आपल्याला जमणार नाही, असे त्यांना वाटते. तर प्रेरणादायी कथा त्यांनी पाहिल्या तर मला वाटते महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील लोकांना प्रेरणा मिळेल. एखाद्याची परिस्थिती नसतानाही जर तो स्टार्टअप करू शकतो तर मी देखील करू शकतो; हा आत्मविश्वास जागवण्याचे खरंच मोठे काम तुम्ही करत आहात. 

प्रश्न - स्टार्टअपबाबत महाराष्ट्रातील युवकांना काय आवाहन कराल? मराठी युवकांनी कोणत्या थीमवर काम करायला हवे?

रितेश देशमुख - स्टार्टअप करताना असे गृहीत धरता येणार नाही की ऑटोमोबाइल किंवा शिक्षणाचे क्षेत्रच चालेल. तुम्हाला जे क्षेत्र आवडते त्यामध्ये काय नवीन दडलेले आहे ते शोधून काढा. अडचणी-अपयश येतील, पण तुमची आवड सोडू नका. मला विचारले कोणते तरी एक क्षेत्र निवडायचे असेल तर फुड टेक क्षेत्रामध्ये आपल्याला काम करता येईल. कारण आजचे युवक तसेच नव्या पिढीला ते काय खात आहेत, हे माहिती आहे. ही मंडळी केवळ पाकीट उचलून घरी घेऊन जात नाहीत तर पाकिटावरील पोषणतत्त्वांची माहिती पाहतात. आज ज्या महिला आई आहेत, त्यांची हीच गरज असते की आपण मुलांना किती पौष्टिक आहार देऊ शकतो. आई-मुलांच्या पोषण आहारामध्ये काही नावीन्य आले तर चांगलेच. 

अपयशाला सामोरे जाण्याचा तुमचा मंत्र काय? 

रितेश देशमुख - तुमचे अपयश जेवढे तुम्हाला शिकवते ना तेवढे यश शिकवू शकत नाही. कितीही अपयश आले तरी जिव्हारी लावून घ्यायचे नाही. पुढे चालत राहायचे. अपयशाला घाबरून मागेच राहिलात तर तुम्ही तेथेच राहाल. कारण जग तुमच्यासाठी थांबणार नाही. तुम्ही पडलात तर उठा पळायला लागा, नक्कीच तुमचा स्पीड वाढेल. पण एकाच ठिकाणी थांबलात तर स्पीड वाढणार नाही. 

चॅट जीपीटी, AI सारख्या काळात तुमची मुले लहानाची मोठी होत आहेत,याबाबत काय सांगाल? 

रितेश देशमुख - माझा आणि जिनिलियाचा सातत्याने हाच प्रयत्न असतो की मुलांना मैदानी खेळ कसे व किती प्रमाणात खेळायला देऊ शकतो. माझी मुलं सकाळी- संध्याकाळी फुटबॉल खेळतात. आम्ही त्यांना आयपॅड देत नाही. आठवड्यातून एका वेळेस दोन तासांसाठी त्यांना आयपॅड मिळते. ते देखील गेम्स वगैरे खेळत नाहीत. कारण या वयामध्ये तुम्ही जेवढे त्यांना खेळण्यासाठी बाहेर पाठवाल तितके ते शिकतील. टेक वगैरे नंतरही येत राहील. सॅटेलाइट पेरेंट होऊ नका. शनिवारी-रविवारी आम्ही दोघंही छत्री-पाण्याची बाटली घेऊन जेथे कुठे त्यांची फुटबॉलची मॅच असेल तेथे आम्ही दोन-तीन तास उभे राहतो. पण केवळ लोकांसोबत सेल्फी काढावे लागतील म्हणून तुम्ही जाणारच नाही, हे वागणे बरोबर नाही. कारण मुलांच्या या गोष्टी लक्षात राहतात. त्यामुळे मुलांसोबत आठवणी जपायला विसरू नका. कारण वेळ निघून गेली ना मग त्या गोष्टी राहत नाहीत.   

VIDEO : NDTV मराठी वृत्तवाहिनीचा लाँच सोहळा LIVE

Topics mentioned in this article