Sagar Karande: सुप्रसिद्ध मराठी अभिनेता सागर कारंडे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे आणि तो प्रेक्षकांचं जबरदस्त मनोरंजनही करतोय. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामुळे सागर कारंडे घराघरात पोहोचला, याद्वारे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. पण काही काळासाठी सागर कारंडे गायब झाला होता. आता बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या निमित्ताने तो पुन्हा एकदा चर्चेत आहे. दरम्यान सागरने इंडस्ट्रीतील लोकांवर केलेल्या भाष्याने सर्वाचं लक्ष वेधून घेतलंय. 'राजश्री मराठी' दिलेल्या मुलाखतीत सागरने इंडस्ट्रीत त्याला आलेले अनुभव सांगितले आहेत.
स्पष्ट स्वभावाचे तोटेच : सागर कारंडे | Sagar Karande | Bigg Boss Marathi 6 Season News
सागर कारंडेनं मुलाखतीत म्हटलं की, मला स्पष्ट बोलण्याचे तोटेच झाले आहेत. आपण जर समोरच्या व्यक्तीला काही सांगितलं की अरे हे असे नको,तर त्याला राग यायचा. मग तो दिग्दर्शक असो, लेखक असो किंवा प्रोड्युसर...कोणीही असेल तरीही आपण सांगणंच चुकीचं आहे, असे वाटतं. पण मला ते पटत नाही, मला ते खटकतं, आपण सांगायला पाहिजे, असे मला वाटतं. मग नंतर काय व्हायचे ते होऊ दे, पण माझ्या मनात काय सुरू आहे, हे त्याला सांगितलं पाहिजे.
इंडस्ट्रीत आता मित्र नाहीत : सागर कारंडे
सागर कारंडे पुढे असंही म्हणाला की," स्पष्ट स्वभावामुळे माझी खूप नाती तुटली, मित्र तुटले. मित्र म्हणता येणार नाही. मी समजत होतो की हे माझे मित्र आहेत, पण तसं नसते. ते काही वर्षांत मला जाणवलं. आपल्याच मित्रांनी आपल्याबद्दल काही कारस्थान करावे, तुमचा वापर जर टिश्यू पेपरसारखा होत असेल, तर मग ती मैत्री नाही ना. नंतर-नंतर मी असं ठरवलं की आपण बोलूयाच नको. मी असा विचार का करतो? तर समोरच्याला वाईट वाटेल, जाऊ दे. मग असाही समज होतो की तो बोलत नाही, त्याला आपण आरामात फसवू शकतो. त्याच्यासोबत व्यवस्थित राजकारण करू शकतो, असे पण लोकांना वाटतं. बोललं तरी प्रोब्लेम आहे, नाही बोलले तरी प्रोब्लेम आहे.
(नक्की वाचा: Rubab Movie: ऑडिशनमध्ये नाकारले, तरीही 'रुबाब'मध्ये चमकले! संभाजी ससाणे–शीतल पाटीलच्या निवडीची जबरदस्त कहाणी)
लोक गृहित धरतात : सागर कारंडेखंत व्यक्त करत सागरने मुलाखतीत सांगितलं की, लोक आपल्याला गृहित धरतात. हा काहीच करू शकणार नाही, याला आपण कधीही जाळ्यात अडकवू शकतो. असे खूप अनुभव आले आहेत. लवकर अनुभव आले ते बरं झालं. त्या अनुभवातून मला शिकता आले, माणसं कळली. मी आता पटकन माणसांना ओळखतो, दोन भेटीमध्ये माणसांना ओळखू शकतो.
(नक्की वाचा: Bapya Movie: 'बाप्या'ने गाठला जागतिक मंच! पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2026मध्ये अधिकृत निवड)
मी स्वतःला का बदलू? मी जसा आहे तसा स्वीकारणारे किती जण आहेत? आहे तसं एकमेकांना स्वीकारणं म्हणजे मैत्री. तुम्ही सल्ले देऊ शकता, तुम्ही भांडू शकता, तुम्ही ओरडू शकता पण तुमचा अट्टहास नको की त्याने बदलावे, ती मैत्री टिकते. आता या इंडस्ट्रीमध्ये माझे मित्र नाहीत.