Chiranjeevi Controversial Statement Over Grandson : तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी यांनी मुलींशी संबंधित केलेल्या विधानामुळे चाहते नाराज झाले आहेत. एका कार्यक्रमामध्ये चिरंजीवी यांनी नातू नसल्याची खंत जाहीररित्या व्यक्त करून दाखवली. आपला वारसा पुढे नेणारे कोणी तरी असावे, अशी भावना त्यांनी जाहीररित्या मांडली. कार्यक्रमामध्ये एका प्रश्नाचे उत्तर देताना चिरंजीवी म्हणाले की,'जेव्हा मी घरामध्ये असतो. तेव्हा मी नातवंडांनी घेरलो गेलोय असे मला वाटत नाही. तर महिलांच्या हॉस्टेलचा वॉर्डन असून मला महिलांनी घेरलंय, असे वाटते. मला (राम) चरणकडून इतकंच हवंय आणि मी त्याला सांगत असतो की किमान यावेळेस तरी मुलगा व्हावा जेणेकरून आपला वारसा पुढे वाढेल. त्यांना पुन्हा मुलगी होईल, याची मला भीती वाटते"
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
चिरंजीवी यांनी केलेल्या विधानाचा सर्व स्तरातून विरोध होऊ लागला आहे. एका चाहत्याने म्हटलंय की, "चिरंजीवी यांनी शब्दांचा अतिशय चुकीचा वापर केलाय. मुलांप्रमाणेच किंवा त्याहूनही चांगल्या पद्धतीने मुली वारसा पुढे नेतात. हा एक चुकीचा संदेश आहे आणि हे आपल्याला काळाच्या अधिक मागे घेऊन जात आहे. प्रत्येकजण त्यांच्या म्हणण्यावर हसत आहेत. ही कृती आपल्या चुकीच्या विचारांना दर्शवत आहे."