Shahrukh Khan : शाहरुख खान नेहमी चर्चेत असतो. शाहरुखच्या चित्रपटांसह त्यातील डायलॉगही लक्षात राहतात. आज शाहरुख खानचा (२ नोव्हेंबर) ६० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने देशच काय पण जगभरातून शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहे. दरम्यान चाहत्याने विचारलेल्या एका प्रश्नाचं शाहरुखने दिलेलं उत्तर सध्या चर्चेत आहे. शाहरुखचा हजरजबाबीपणा चाहत्यांना प्रचंड आवडतो. गुरुवारी शाहरुखने सोशल मीडियावर चाहत्यांनी संवाद साधत होता. यावेळी तो वैयक्तिक माहितीसह प्रोफेशनल आयुष्याबद्दल उत्तर देत होता. चाहत्याने शाहरुखला अनेक मजेशीर प्रश्न विचारले, शाहरुखनेही त्याला मजेशीर उत्तरं दिली. एका चाहत्याने शाहरुखला मन्नतमधील एका खोलीचं भाडं विचारलं, ज्यावर किंग खानने मजेशीर उत्तर दिलं.
मी भाड्याने राहतोय...
एका चाहत्याने विचारलं, सर, मी तुमच्या वाढदिवसासाठी मुंबईला पोहोचलो आहे. पण मला राहण्यासाठी एकही रुम सापडत नाहीये. मला मन्नतमध्ये एक खोली मिळेल का, सर? शाहरुख खानने खूप मजेदार उत्तर दिले. त्याने लिहिले, मन्नतमध्ये तर माझ्याकडेही रुम नाहीये. सध्या मीच भाड्याने राहतोय.
मन्नतमध्ये सुरू आहे रिनोव्हेशनचं काम...
शाहरुख खान आणि त्याचे कुटुंब मन्नत सोडून एका बंगल्यात राहायला गेले आहेत. मन्नतमध्ये नूतनीकरणाचे काम सुरू आहे. ज्यामुळे संपूर्ण खान कुटुंबाला दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करावे लागले. नूतनीकरणाला अनेक वर्षे लागतील, म्हणून शाहरुखने एका आलिशान अपार्टमेंटचे चार मजले भाड्याने घेतले आहेत, जिथे तो काही काळ राहणार आहे.
कामाबद्दल सांगायचं झालं तर शाहरुख खान लवकरच किंग चित्रपटात दिसणार आहे. चाहत्यांमध्येही या चित्रपटाची प्रतीक्षा आहे. या चित्रपटात शाहरुखसह त्याची मुलगी सुहाना खानदेखील स्क्रिन शेअर करेल. पहिल्यांदाच वडील आणि मुलीची जोडी चित्रपटात दिसणार आहे. या दोघांव्यतिरिक्त चित्रपटात दीपिका पादुकोन आणि अभिषेक बच्चनही महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.