"कुणाशी तरी आघाडी करुन तुम्ही विकलात हा भगवा रंग...",  रोख कुणाकडे? 'धर्मवीर 2'च्या डायलॉगची चर्चा

Dharmaveer 2 Trailer : दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या बायोपिकचा सिक्वेल असलेला 'धर्मवीर 2' हा चित्रपट 9 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

'धर्मवीर मुक्काम पोस्ट 2' सिनेमाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरच्या सुरुवातीच्याच डायलॉगने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ट्रेलरच्या सुरुवातीला असलेल्या डायलॉगद्वारे उद्धव ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटावर निशाणा साधवण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. धर्मवीर 2 सिनेमाच्या या ट्रेलरमध्ये शिवसेना, दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाच्या दृष्टीची झलक दिसून आली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय आहे डायलॉग?

"आपल्या संघटनेचा माज आहे हा भगवा रंग. सनातन हिंदू धर्माचा संस्कार आहे हा भगवा रंग. छत्रपती शिवरायांचं स्वप्न होता हा भगवा रंग. आणि कुणाशी तरी आघाडी करुन तुम्ही विकलात हा भगवा रंग...", धर्मवीर सिनेमातील हा दमदार डायलॉग प्रेक्षकांच्या पसंतील उतरताना दिसत आहे. मात्र  या डायलॉगचे वेगवेगळे राजकीय अर्थ देखील काढले जात आहेत. 

(नक्की वाचा- 'ज्याच्या घरातली लक्ष्मी दु:खी, त्याची बरबादी नक्की! धर्मवीर 2 चा ट्रेलर आला)

"कुणाशी तरी आघाडी करुन तुम्ही विकलात हा भगवा रंग", डायलॉगमधील या ओळीचा नेमका रोख कुणाकडे अशी चर्चा आता सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीशी हातमिळवणी करुन महाविकास आघाडी स्थापन करण्याच्या निर्णयाला याच्याशी जोडलं जात आहे. यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(नक्की वाचा - उद्धव ठाकरेंची विधानसभेसाठीची रणनिती ठरली; संपर्कप्रमुखांना दिले महत्त्वाचे निर्देश)

दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या बायोपिकचा सिक्वेल असलेला 'धर्मवीर 2' हा चित्रपट 9 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रविण तरडे यांनी या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन केलं आहे. तर मंगेश देसाई आणि उमेश बन्सल यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने चित्रपटाचं टायमिंगही चर्चेत आहे.