14व्या वर्षी वृद्धाशी लग्न! 1983मध्ये 44 सिनेमांमध्ये झळकली, अभिनेत्रीची शेवटची चिठ्ठी वाचून डोळ्यात येईल पाणी

Silk Smitha: मृत्यूच्या आदल्या रात्री त्यांनी आपल्या मित्रमैत्रिणींना संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला होता, ज्यामध्ये अनुराधा आणि अभिनेते रविचंद्रन यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली होती. पण या लोकांशी त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

जाहिरात
Read Time: 3 mins
"Silk Smitha: ही अभिनेत्री वर्ष 1983मध्ये 44 सिनेमांमध्ये झळकली होती"
Social Media

Silk Smitha: सिल्क स्मिता भारतीय सिनेसृष्टीतील अशा अभिनेत्रींपैकी एक होत्या, ज्यांनी गरिबीतून बाहेर पडून दाक्षिणात्य सिनेमांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले. वर्ष 1980 ते वर्ष 1990 दरम्यान त्या अनेक सिनेमांचा अविभाज्य भाग राहिल्या होत्या. बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनच्या 'द डर्टी पिक्चर' या सिनेमातून त्यांची कथा जगासमोर आली, पण त्यांचा प्रत्यक्ष प्रवास अतिशय संघर्षमय होता. 

सिनेमांमध्ये येण्यापूर्वी सिल्क स्मिता यांचे आयुष्य सोपे नव्हते

आंध्र प्रदेशातील एका छोट्या गावात 'वडलापती विजयालक्ष्मी' म्हणून जन्मलेल्या सिल्क स्मिताचे बालपण गरिबीत गेले. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना वयाच्या 10व्या वर्षी चौथी इयत्तेतच शिक्षण सोडावे लागले. वयाच्या 14व्या वर्षी त्यांची इच्छा नसतानाही एका वृद्धाशी लग्न लावून देण्यात आले. सासरी त्यांना अपमानास्पद वागणूक आणि अत्याचार सहन करावे लागले. सुमारे दोन वर्षे छळ सहन केल्यानंतर त्यांनी त्या बंधनातून मुक्त होऊन स्वतःच्या बळावर जगण्याचा निर्णय घेतला.

Advertisement

सिनेमांमध्ये आजमावलं नशीब

लग्न मोडल्यानंतर त्या आपल्या नातेवाईकाच्या मदतीने शहरात स्थलांतरित झाल्या. उदरनिर्वाहासाठी त्यांनी सिनेमाच्या सेटवर साहाय्यक महिला आणि टच-अप आर्टिस्ट म्हणून काम केले. सेटवर काम करत असताना त्यांना अभिनयाची संधी मिळाली आणि त्या छोट्या भूमिका करू लागल्या. सिल्क स्मिता यांना सिनेसृष्टीत आणण्याचे श्रेय सिनेनिर्माते वीनू चक्रवर्ती यांना दिले जाते. त्यांनी स्मिताला अभिनय, नृत्य आणि देहबोलीचे प्रशिक्षण दिले. त्यांना पहिला मोठा ब्रेक 'इनाये थेडी' या सिनेमातून मिळाला. पण सिनेमा उशीराने रिलीज झाल्याने त्यांची ओळख निर्माण होण्यापूर्वी अन्य मल्याळम सिनेमांमध्ये काम करावं लागलं. 

(नक्की वाचा: VIDEO: कृष्णाने गोविंदाच्या पत्नीच्या पायाशी घातलं लोटांगण, 14 वर्षांच्या वादावर कश्मीराने सर्वांसमोर केले मोठे विधान)

चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळ

वर्ष 1980मध्ये रिलीज झालेल्या 'वंडिचक्करम' या तमिळ भाषिक सिनेमामुळे त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. सिनेमामध्ये त्यांनी 'सिल्क' नावाचे बोल्ड आणि ग्लॅमरस पात्र साकारले, ज्यामुळे त्या 'सिल्क स्मिता' म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते, "मला सावित्री किंवा सुजाता यांच्यासारख्या 'कॅरेक्टर अभिनेत्री' व्हायचे होते, पण या सिनेमामुळे मला कायम ग्लॅमरस भूमिका मिळत गेल्या. मी निर्माते आणि दिग्दर्शकांना नाराज करू शकत नव्हते, म्हणून मी या भूमिका साकारत गेले."

450 सिनेमांमध्ये केले काम 

सिल्क स्मिता यांनी 450 सिनेमांमध्ये काम केले. ज्यामध्ये हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा 5 भाषांचा समावेश होता. रजनीकांत, कमल हासन आणि मोहनलाल यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केले. विशेष म्हणजे वर्ष 1983मध्ये त्या  कथित स्वरुपात 44  सिनेमांमध्ये झळकल्यांचेही म्हटले जाते. 

Photo Credit: NDTV Marathi

आपल्या कारकिर्दीत यशाच्या शिखरावर असताना सिल्क स्मिता एका डान्स सीक्वेन्ससाठी 50 हजार रुपये मानधन घेत असे, असे म्हटले जाते. काही काळ त्या मुख्य अभिनेत्रीपेक्षाही जास्त कमाई करत होती. एका मुलाखतीत त्यांनी इंडस्ट्रीतील त्यांच्याविरोधातील मत्सराबाबत बोलताना सांगितले, "माझी कारकीर्द छोटी आहे. फक्त चार वर्षे झाली आहेत आणि या काळात मी 200 हून अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे. साहजिकच असे बरेच लोक आहेत ज्यांना माझ्या यशाचा मत्सर वाटतो. माझा विश्वास आहे की, या सर्व द्वेषपूर्ण अफवा पसरवण्यामागे असेच लोक आहेत. ते माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत."

Advertisement

(नक्की वाचा: Bollywood News: बॉलिवूडच्या बड्या कोरिओग्राफरचं वयाच्या 15व्या वर्षी धर्मपरिवर्तन, शिवलिंगाबाबत केला खुलासा)

अखेरचा काळ आणि दुःखद अंत

90च्या दशकात त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली. स्पर्धा वाढली आणि सिनेमांचे प्रस्ताव कमी झाले. फिल्म प्रॉडक्शनमधील गुंतवणुकीत नुकसान झाल्याने त्या आर्थिक संकटात सापडल्या. 23 सप्टेंबर 1996 रोजी वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी त्या आपल्या घरी मृतावस्थेत सापडल्या. अभिनेत्रीने आत्महत्या केल्याचे म्हटले जाते. मृत्यूच्या आदल्या रात्री त्यांनी आपल्या मित्रमैत्रिणींना संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला होता, ज्यामध्ये अनुराधा आणि अभिनेते रविचंद्रन यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली होती. पण या लोकांशी तिचा संपर्क होऊ शकला नाही. त्यांच्या मृत्यूनंतर मिळालेल्या नोटमध्ये लिहिले होते, "मी अभिनेत्री बनण्यासाठी किती कष्ट घेतले, हे फक्त मलाच ठाऊक आहे. मला कोणीही खरे प्रेम दिले नाही, प्रत्येकाने फक्त माझ्या मेहनतीचा फायदा उठवला."