Krushna Abhishek News: 'लाफ्टर शेफ'च्या नव्या एपिसोडमध्ये एक असा क्षण पाहायला मिळाला, जेथे केवळ मायेने मारलेल्या हाकेने 14 वर्षांचा दुरावा कायमचा दूर केला. सेटवर अचानक 'कृष्णा... कृष्णा...' अशी हाक ऐकू आली आणि जशी सर्वांची नजर दाराकडे वळली, तेथे सुनीता आहुजा उभ्या होत्या. याक्षणी वेळ थांबल्यासारखं सर्वांना वाटलं. कृष्णा अभिषेकच्या चेहऱ्यावर सुरुवातीला आश्चर्य, मग वेदना आणि शेवटी सुटकेचा निश्वास स्पष्ट दिसत होता. एका हाकेने नात्यातील अनेक वर्षांचा कडवटपणा जणू एका क्षणात दूर केला आणि संपूर्ण सेटवरील वातावरण भावुक झाले.
मामी समोर येताच श्वास रोखला गेला, अन्...
सुनीता मामीला समोर पाहताच कृष्णा आणि कश्मीरा काही क्षण स्तब्ध झाले. मामी सेटवर आल्याचा आनंद कसा व्यक्त करावा? कशी प्रतिक्रिया द्यावी? हे क्षणभर दोघांनाही समजत नव्हते. पण त्यांचे डोळे सर्व काही सांगत होते. कित्येक वर्षांपासून मनात दडलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी वाट मिळाली. सेटवर उपस्थित प्रत्येक व्यक्तीने या कुटुंबाचा भावुक क्षण अनुभवला.
कृष्णाने मामीच्या पायाशी लोटांगण घातले
काही सेकंदानंतर कृष्णा स्वतःला रोखू शकला नाही आणि धावत जाऊन त्यानं मामींच्या पायासमोर लोटांगण घातले. त्याचे डोळे भरून आले आणि तो फक्त इतकेच म्हणू शकला की, "14 वर्षे झाली..." हे ऐकताच वातावरण अधिकच भावुक झाले. सुनीता मामीने लगेच त्याला जवळ घेऊन मिठी मारली, जणू काही वर्षांपासून दुरावलेला आपला मुलगा तिला पुन्हा मिळाला.
(नक्की वाचा: Bollywood News: बॉलिवूडच्या बड्या कोरिओग्राफरचं वयाच्या 15व्या वर्षी धर्मपरिवर्तन, शिवलिंगाबाबत केला खुलासा)
कश्मीराला अश्रू अनावर, मनापासून मागितली माफी
हे दृश्य पाहून कश्मीरा शाहही भावुक झाली. ती रडत सुनीता यांच्याकडे गेली आणि हात जोडून माफी मागू लागली. सुनीतानंही क्षणाचा विलंब न लावता तिला माफ केले. त्यानंतर तिघांनी एकमेकांना मिठी मारली आणि जुना वाद तिथेच संपला.
नात्यात दुरावा का आला होता?
कृष्णा आणि सुनीता आहुजा यांच्यातील वाद सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे सुरू झाला होता. ही पोस्ट आपल्या कुटुंबासाठी टोमणा असल्याचे सुनीताला वाटलं होतं. यामुळे नात्यात दुरावा निर्माण झाला. मुलाखतींमध्येही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत राहिले. पण आता राग-दुरावा-वाद सर्व काही मिटले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world